
श्री शिवाजी महाविद्यालयात शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दि. ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ आणि ‘स्वयंशासन दिन’ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दिवसाची सुरुवात सकाळच्या सत्रात ‘स्वयंशासन दिनाने’ झाली.यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून वर्ग अध्यापनाचे कार्य यशस्वीपणे सांभाळले.विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि जबाबदारीने विविध विषयांचे तास घेतले.त्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि उत्कृष्ट शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पांडे हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. संजय पट्टेबहादुर आणि एच.एस.व्हि.सी. (HSVC) विभाग प्रमुख प्रा. अर्चना कुचे यांची व्यासपीठावर उपस्थिती लाभली. याप्रसंगी आयोजित मनोगत सत्रात अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांचे मानवी जीवनातील स्थान आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती असलेला आदर व कृतज्ञता आपल्या भाषणांमधून मांडली.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुनील पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिक्षक हे केवळ ज्ञान देण्याचे काम करत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन त्यांना सुजाण नागरिक बनवतात.कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षक प्रा संजय पट्टेबहादुर यांनी शिक्षणाच्या राष्ट्र उभारणीतील योगदान उपस्थितांना समजून सांगितले.स्वयंशासन दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा.प्रफुल्ल देशमुख, प्रा. परीक्षीत मेतकर, प्रा. रेणुका पुंडकर, प्रा. मंगेश अवचट, प्रा. मंगेश राऊत, प्रा. सौदागर भिसे, प्रा. चेतन चुने, प्रा.शशिकांत पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पूर्ण कार्यक्रम उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
