मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान जयराम आरू यांचा देहदानाचा आदर्श

मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान जयराम आरू यांचा देहदानाचा आदर्श संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा देहदान जनजागृतीसाठी पुढाकार

वाशिम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि. ५ सप्टेंबर (जिमाका): मृत्यूनंतरही आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी पडावा आणि आपल्या देहाच्या माध्यमातून भावी डॉक्टरांना ज्ञान मिळावे, या उदात्त मानवतावादी भावनेतून रिठद, ता. रिसोड येथील स्व. जयराम सूर्याजी आरू (वय ८८) यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या इच्छेचा आदर राखत कुटुंबीयांनी त्यांचा देह संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, वाशिम येथे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी दान केला.सुमारे दोन वर्षांपूर्वीच स्व. जयराम आरू यांनी मृत्यूनंतर आपला देहदान करण्याची इच्छा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. “मृत्यूनंतर माझा देह कोणाच्या तरी उपयोगी पडावा,” या सामाजिक भावनेतून त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांच्या या इच्छेला कुटुंबीयांनी मान देत देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली.या सामाजिक कार्यासाठी त्यांच्या पत्नी चंद्रभागा जयराम आरू, मुलगी सुशिला नामदेव वाघ, तसेच मुले जगन्नाथ जयराम आरू व सुरेश जयराम आरू यांनी सहकार्य केले.देहदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतीन मेश्राम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अविनाश पुरी, शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रहेमान, डॉ. पंकज वाडेकर, डॉ. किशोर पवार, डॉ. सचिन सानप आणि कु. धनश्री कोटटेवार यांनी मोलाचे सहकार्य केले.देहदानाबाबत गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृतीसमाजामध्ये देहदानाबाबत असलेले गैरसमज दूर करून देहदानाचे महत्त्व, वैद्यकीय शिक्षणातील त्याचे योगदान आणि मृत्यूनंतरही समाजासाठी योगदान देण्याची भावना रुजविण्यासाठी संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, वाशिम यांच्या वतीने सातत्याने विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.महाविद्यालयाच्या वतीने देहदान जनजागृतीसाठी पथनाट्य, जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शनपर उपक्रम आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद अशा विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. देहदानाबाबत नागरिकांनी पुढे यावे आणि मृत्यूनंतरही आपला देह वैद्यकीय शिक्षणासाठी उपयोगी पडावा, यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.स्व. जयराम सूर्याजी आरू यांनी केलेले देहदान हे या जनजागृतीच्या प्रयत्नांना मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाचे उदाहरण ठरले आहे. त्यांच्या निर्णयातून मृत्यूनंतरही समाजाच्या उपयोगी पडण्याची मानवतावादी भावना अधोरेखित झाली आहे.संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, वाशिम यांच्या वतीने स्व. जयराम सूर्याजी आरू यांच्या कुटुंबीयांचे या उदात्त सामाजिक कार्यासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *