
तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ‘नो पार्किंग’चा फज्जा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मागणी
तालुका नांदुरा, प्रतिनिधी (संदेश पहुरकर )
दि. ०३ सप्टेंबर २०२६ : नांदुरा येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात व प्रवेशद्वारासमोर ‘नो पार्किंग’चे स्पष्ट फलक लावलेले असतानाही मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने उभी करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.तहसील कार्यालयात दररोज विविध शासकीय कामांसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच वाहने उभी राहत असल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ‘नो पार्किंग’चे फलक लावण्यात आले आहेत, त्याच ठिकाणी वाहनांचे पार्किंग होत असल्याने नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.कार्यालयीन परिसरातील शिस्त व सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच कार्यालयाच्या परिसरात योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.नियम सर्वांसाठी समान असतील तर शासकीय कार्यालयाच्या परिसरातही त्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे,’ अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
