रेल्वे प्रशासनाचा सकारात्मक निर्णय; दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा

MH56 प्रादेशिक प्रवासी संघटनेच्या मागणीला यश; विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा येथे थांबा रेल्वे प्रशासनाचा सकारात्मक निर्णय; दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना मोठा दिलासा

नांदुरा तालुका प्रतिनिधी (संदेश पहुरकर)

नांदुरा : नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जाणाऱ्या बौद्ध उपासक व अनुयायांच्या सोयीसाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा (NN) रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची MH56 प्रादेशिक प्रवासी संघटनेची मागणी अखेर मान्य झाली आहे. संबंधित विशेष गाड्यांना नांदुरा येथे थांबा मिळाल्याने नांदुरा शहरासह परिसरातील प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.MH56 प्रादेशिक प्रवासी संघटना, नांदुरा यांच्या वतीने यापूर्वी नांदुरा रेल्वे स्थानकाच्या स्टेशन व्यवस्थापकांना लेखी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या प्रती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, CSMT मुंबई तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), भुसावळ मंडळ यांनाही पाठविण्यात आल्या होत्या.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी नांदुरा व परिसरातून मोठ्या संख्येने अनुयायी जातात. त्यामुळे पुणे–नागपूर, नाशिक–नागपूर, मुंबई–नागपूर, नागपूर–भुसावळ आणि सोलापूर–नागपूर मार्गावरील विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा स्थानकावर तात्पुरता थांबा देण्याची मागणी संघटनेने केली होती.रेल्वे प्रशासनाने या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विशेष रेल्वेगाड्यांना नांदुरा येथे थांबा उपलब्ध करून दिल्याने दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. नांदुरा हे परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने या निर्णयाचा लाभ मोठ्या संख्येने प्रवाशांना होणार आहे.MH56 प्रादेशिक प्रवासी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेल्या या यशाबद्दल प्रवाशांकडून संघटनेचे कौतुक करण्यात येत आहे. संघटनेचे अध्यक्ष अशोकराव घनोकार, सदस्य जितेंद्र थावरानी तसेच संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.प्रवाशांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटना यापुढेही सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे अध्यक्ष अशोकराव घनोकार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *