धारगड यात्रेसाठी वन विभागाचे नियम कडक,प्लास्टिक आणि फुलहारांवर बंदी

धारगड यात्रेसाठी वन विभागाचे नियम कडक,प्लास्टिक आणि फुलहारांवर बंदी ३० व ३१ ऑगस्ट दोन दिवस यात्रा,प्रशासन सज्ज

देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी

श्री क्षेत्र धारगड यात्रा ३० ऑगस्ट पासून सुरुवात होत असून दोन दिवस यात्रा राहणार आहे.भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येत असलेल्या या पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्रावर लाखो भाविक हजेरी लावतात.या पार्श्वभूमीवर वन विभागाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काटेकोर नियमावली जाहीर केली असून त्याचे पालन करणे सर्व भाविकांना बंधनकारक असणार आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनविभागाने यावर्षी प्लास्टिक पिशव्या,प्लास्टिकच्या वस्तू आणि फुलहारांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.वन्यजीवांना प्लास्टिकमुळे धोका निर्माण होऊ नये आणि जंगल परिसरात कचरा होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.भाविकांनी आपल्यासोबत प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बंदी असलेल्या वस्तू आणू नयेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.यात्रा सुविधेसाठी आणि सुरक्षेसाठी वन विभाग,पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले असून भाविकांची चौकशी व तपासणी केली जात आहे.जंगलात कोणत्याही प्रकारे आग लावणे,कचरा टाकणे किंवा वन्यजीवांना त्रास देणे यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.निसर्गाचे नियम पाळून भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि दर्शन घ्यावे असे आवाहन वन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *