ऑनलाइन तक्रारीनंतर नवदुर्गा स्वीट्सच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह? तपासणीची मागणी

ऑनलाइन तक्रारीनंतर नवदुर्गा स्वीट्सच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह? तपासणीची मागणी

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

शहरातील गाडगे महाराज पुलाजवळील नवदुर्गा स्वीट्स येथून खरेदी केलेल्या जलेबीच्या गुणवत्तेबाबत एका ग्राहकाने गंभीर तक्रार नोंदविली आहे. संबंधित तक्रारदाराने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) ऑनलाइन पोर्टलवर तसेच बुलढाणा येथील संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार दिनेश आसटकार. राहणार वृंदावन नगर मलकापूर यांच्या म्हणण्यानुसार, दिनांक 29 ऑगस्ट 2026 रोजी नवदुर्गा स्वीट्समधून खरेदी केलेली जलेबी खराब अवस्थेत असून तिच्यातून दुर्गंधी येत होती. सदर जलेबी खाल्ल्यानंतर उलटीचा त्रास झाल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. यानंतर त्यांनी संबंधित दुकानात जाऊन वस्तू परत केली असता दुकानाकडून पैसे परत देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदाराने अन्न व औषध प्रशासनाकडे केलेल्या ऑनलाइन तक्रारीत दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी, विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाई व खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची सखोल चौकशी, तसेच अन्न सुरक्षा नियमांचे पालन होत आहे का याची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.
यासोबतच दुकानातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेऊन त्यांची प्रयोगशाळा चाचणी करण्यात यावी, तसेच ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबी गांभीर्याने हाताळून दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, ऑनलाइन तक्रार दाखल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील तपासणी व चौकशीसंदर्भात कोणती भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित प्रकरणाची अधिकृत चौकशी पूर्ण होईपर्यंत तक्रारदाराचे आरोप हे प्राथमिक स्वरूपाचे असून त्याबाबत प्रशासनाचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *