आगर येथे आई भवानी यात्रा महोत्सवाला सुरुवात
अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर
आगर येथील पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या आई भवानी मंदिरात नवरात्र महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून दरवर्षी आई भवानी मातेच्या दर्शनासाठी दूरवरून येऊन गर्दी करत असतात. नवरात्रीच्या निमित्ताने येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते तसेच या देवस्थानाबाबत विविध आख्यायिका आहेत.अकोला शहरापासून जवळच असलेल्या आगर येथील आई भवानी देवीच्या जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या देवीच्या या मंदिराचे बांधकाम संपूर्ण पापाणात आहे.हे मंदिर कोणत्या काळातील आहे याबाबत कुठेही उल्लेख नाही. परंतु, एका रात्रीमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचे येथील जुने जाणते वृद्ध ग्रामस्थ सांगतात. देवीच्या मंदिरात वापरण्यात आलेल्या दगडावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे. दगडावर गणपती, महादेवाच्या व देवीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.मंदिरामध्ये आई भवानी मातेची आकर्षक मूर्ती आहे. ही मूर्ती विहिरीवर विराजमान असल्याचे दिसून येत. नवरात्री मध्ये याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये पहाटे पासून रात्री उशीरापर्यंत पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. परिसरातील पाळोदी, कंचनपुर, गोत्रा, खांबोरा, लोनाग्रा, हातरुण, उगवा, टाकळी, जैनपूर, पिंपळोद, पळसोद, बोरगाव वैराळे, काटी पाटी, म्हातोडी येथील भाविक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. तसेच नवरात्रीच्या निमित्ताने देवी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यासंपूर्ण कार्यक्रमात संपूर्ण गावकरी मंडळी सहभागी होतात.

