
अकोला जिल्ह्याची शान पियुषपाल चिंचोळकर यांची ‘सा रे ग म प’साठी निवड
अकोला : देवानंद खिरकर
अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून,गायन क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकार,गुरुवंदन स्टुडिओचे संचालक व संगीत विशारद पियुषपाल गजानन चिंचोळकर यांची झी मराठी या चॅनल वरील ‘सा रे ग म प’ या लोकप्रिय संगीत कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे अकोला जिल्ह्यातील संगीतप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.पियुषपाल चिंचोळकर हे राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे पुतणे आहेत. विशेष म्हणजे, पियुषपाल यांचे वडील गजानन चिंचोळकर हे गेल्या ५० वर्षांपासून प्रबोधनसम्राट सत्यपाल महाराज यांच्यासोबत गायन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे पियुषपाल यांना संगीत व गायनाची समृद्ध परंपरा घरातूनच लाभली आहे.लहानपणापासूनच संगीताची आवड आणि गायनाची साधना जोपासणाऱ्या पियुषपाल यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर अकोला जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गुरुवंदन स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कामही केले आहे.आता त्यांच्या आवाजाची दखल महाराष्ट्राच्या लोकप्रिय संगीत कार्यक्रमाने घेतली असून, २२ ऑगस्ट २०२६ पासून दर शनिवार व रविवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर ‘सा रे ग म प’ या कार्यक्रमातून पियुषपाल महाराष्ट्राच्या रसिकांसमोर येणार आहेत.अकोला जिल्ह्यातील या गुणी कलाकाराला मोठ्या प्रमाणात प्रेम, शुभेच्छा व आशीर्वाद देत ‘सा रे ग म प’चा कार्यक्रम आवर्जून पाहावा आणि पियुषपाल चिंचोळकर यांना भरभरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन संगीतप्रेमी व त्यांच्या चाहत्यांकडून करण्यात येत आहे.“पियुषपाल केवळ गाणार नाहीत, तर आपल्या सुरांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील,” असा विश्वास त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केला आहे.अकोला जिल्ह्याच्या या गुणी कलाकाराला मनःपूर्वक शुभेच्छा!
