अकोलखेड मंडळात दुष्काळ पाहणीसाठी पंचनामे सुरूतलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक,शेतशिवारात पाहणी, पंचनामे व सर्व्हेला सुरुवात

अकोलखेड मंडळात दुष्काळ पाहणीसाठी पंचनामे सुरू तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,शेतशिवारात पाहणी, पंचनामे व सर्व्हेला सुरुवात

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर अकोट

तालुक्यातील अकोलखेड मंडळातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाचे संयुक्त पथक थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करत आहेत.तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांच्या पथकाकडून शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पिकांची पाहणी करून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.अकोलखेळ मंडळात यंदा सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली.त्यामुळे सोयाबीन,कापूस,तूर यासह खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे.अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून सोयाबीन पिके करपली आहेत.कापसाला अपेक्षित बोंडधारणा झालेली नाही तर तुरीच्या वाढीलाही मोठा फटका बसला आहे. जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे पिके सुकत आहे.अकोलखेळ मंडळात.अकोलखेड,रामापूर,मोहाळा,मलकापूर,,शाहनूर,सुकळी,आदी गावांचा समावेश आहे.या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी बँक तसेच इतर माध्यमातून कर्ज घेऊन खरीप पिकांची पेरणी केली होती.मात्र पावसाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.प्रत्येक शेताची वस्तुनिष्ठ पाहणी करून संयुक्त पथकाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतशिवारात पाहणी सुरू केली.यावेळी पिकांची उंची,वाढीची स्थिती,पानांचा रंग,जमिनीतील ओलावा,फळधारणा तसेच पिकांचे झालेले नुकसान याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे.आवश्यक त्या ठिकाणी पंचनामे करून शेताचे फोटो व व्हिडिओही घेतले जात आहेत.शेतकऱ्याचे नाव,गट क्रमांक,क्षेत्रफळ आणि शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन झालेल्या नुकसानीची माहिती नोंदविण्यात येत आहे.प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.अकोलखेड येथील एका शेतकऱ्याने सांगितले, “यावर्षी सुरुवातीला पाऊस झाला; मात्र त्यानंतर जवळपास दोन महिने पाऊसच झाला नाही.त्यामुळे सोयाबीनचे पीक डोळ्यादेखत जळून गेले.अनेक शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन पेरणी केली आहे.आता हे कर्ज कसे फेडायचे, हा मोठा प्रश्न आहे. आज तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि कोतवाल आमच्या बांधावर आले.त्यांनी शेताची पाहणी करून आमचे म्हणणे ऐकून घेतले. शासनाचे अधिकारी प्रत्यक्ष बांधावर आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. शासनाने लवकर दुष्काळ जाहीर करून मदत करावी,” अशी मागणी त्यांनी केली.तलाठी, कृषी सहाय्यक,व ग्रामसेवक यांनी सांगितले की, “शासनाच्या आदेशानुसार अकोलखेड मंडळात दुष्काळी परिस्थितीची पाहणी व सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल आणि शेतकरी यांचे संयुक्त पथक प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहे. प्रत्येक शेताची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात येत आहे. हा अहवाल दोन दिवसांत तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला जाईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *