
सुनगावात स्तनपान सप्ताह उत्साहात; मातांना पोषण व स्तनपानाचे धडे
जळगाव जामोद(प्रतिनिधी) सुरेंद्र गवई
बालविकास प्रकल्प जळगाव जामोद आणि आरोग्य वर्धिनी केंद्र जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने सुनगाव येथील अंगणवाडी केंद्रात स्तनपान सप्ताहानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील स्तनदा माता, गरोदर महिला, किशोरवयीन मुली तसेच लहान बालकांच्या आरोग्य व पोषणाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व स्तनदा व गरोदर मातांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक डॉ. शारदा पंडित, समुदाय अधिकारी, सुनगाव यांनी स्तनपानाचे महत्त्व, मातांचा आहार, पूरक आहार तसेच बालकांच्या योग्य पोषणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.बाळाच्या जन्मानंतर आईचे दूध हे बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी योग्य पोषणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जामोद बीट क्रमांक १ च्या पर्यवेक्षिका रेखा वानखडे यांनी मातांना बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देण्याचे महत्त्व समजावून सांगितले. सहा महिन्यांनंतर स्तनपान सुरू ठेवून बाळाला वयानुसार योग्य पूरक आहार कसा द्यावा, कोणते पोषक पदार्थ द्यावेत तसेच बालकाच्या वाढीकडे आणि आरोग्याकडे कशा पद्धतीने लक्ष द्यावे, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.स्तनपानामुळे बालकाला आवश्यक पोषण मिळण्यासोबतच त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक मातेने बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपानाला प्राधान्य द्यावे, असा संदेश या स्तनपान सप्ताहाच्या माध्यमातून देण्यात आला.तसेच मातांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देऊन सकस व संतुलित आहार घ्यावा. आईचे आरोग्य चांगले राहिल्यास बाळाच्या पोषणालाही त्याचा सकारात्मक फायदा होतो, याबाबतही उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका चंदा चिंचोळकार यांनी केले, तर प्रास्ताविक अंगणवाडी सेविका गीता दामधर यांनी केले.यावेळी अंगणवाडी सेविका गीता दामधर, सुनिता भड, शांता कोथळकार, अनुसया वंडाळे, मीना जोशी, सखु पाटील, पुष्पा सांगळे, वेणू वानखडे, चंदा चिंचोळकार यांच्यासह मदतनीस लीला नानग्दे, वैशाली आकोटकार, शोभा कतोरे, आम्रपाली अंदुरकार, प्रमिला तायडे, आरेफा बी, सविता धुळे, ज्योती उमाळे, वर्षा धर्मे तसेच आशा सेविका मंदा मिसाळ, रेखा घोलप, रेखा भगत, स्वाती हांडे, सुनिता ढगे, उज्ज्वला मिसाळ, गीता बैस यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाला गावातील स्तनदा माता, गरोदर महिला, किशोरवयीन मुली आणि लहान बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित मातांना पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.
