
बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावेजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरप्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भरबालमृत्यू अन्वेषण आढावा बैठक
वाशिम, जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि. ७ ऑगस्ट (जिमाका): जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून माता व बालकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बालमृत्यू अन्वेषण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी गरोदरपणातील तसेच प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंती टाळण्यासाठी गरोदर महिलांनी गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांत अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन केले. तसेच मृत बालकाच्या नातेवाईकांशी संवाद साधून गरोदर माता व बालकाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आरोग्य सेवांची माहिती घेतली.गरोदरपणात देण्यात आलेल्या सर्व आरोग्य सेवांच्या नोंदी अचूक, अद्ययावत व कायमस्वरूपी जतन करण्याच्या सूचना देताना भविष्यात जन्मनोंदींच्या पडताळणीसाठी या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.खाजगी दवाखाने व प्रसूतीगृहांनी नवजात बालकांना जन्मानंतर दिल्या जाणाऱ्या लसींबाबत पालकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, तसेच सर्व लसी वेळेत घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश त्यांनी दिले. लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रत्येक लसीची नोंद यू-वीन प्रणालीवर विहित कालावधीत ऑनलाइन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.मुलींमध्ये भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावे, यासाठी प्रत्येक शाळेत नियमित पालक-शिक्षक बैठक आयोजित करून जनजागृती करण्यावर भर देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.जिल्ह्यातील बालकांना गोवरापासून सुरक्षित ठेवण्यासाठी गोवर लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नवजात बालकांच्या श्रवणदोष निदानासाठी करण्यात येणाऱ्या ओटोअॅकॉस्टिक एमिशन तपासणीसाठी येणाऱ्या राज्यस्तरीय पथकास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.वेळेवर निदान, दर्जेदार उपचार, नियमित लसीकरण आणि प्रभावी जनजागृती यांच्या माध्यमातून बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलता, जबाबदारी आणि समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
