कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पिकांवरील किड व रोग ओळखण्याचे प्रशिक्षण संपन्न

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने पिकांवरील किड व रोग ओळखण्याचे प्रशिक्षण संपन्नमहाविस्तार-एआय प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक अचूक व वेळेवर कृषी मार्गदर्शन

वाशिम, जिल्हा प्रतिनिधी अनिल जाधव

दि. ७ ऑगस्ट (जिमाका): पिकांवरील किड व रोगांचे अचूक निदान करून शेतकऱ्यांपर्यंत वेळेत प्रभावी कृषी सल्ला पोहोचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी विदाता प्रशिक्षण केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, वाशिम येथे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) २.० अंतर्गत टीआयएच फाउंडेशन फॉर आयओटी अँड आयओई, आयआयटी मुंबई तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त सहकार्याने पिकांसाठी मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित किड व रोग ओळख प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे पिकांवरील किड व रोगांची जलद व अचूक ओळख करून त्याबाबतची माहिती महाविस्तार-एआय या मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणात तालुका कृषी अधिकारी, नोडल अधिकारी, तंत्र अधिकारी (विस्तार), मास्टर ट्रेनर क्रॉपसॅप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील समूह सहाय्यक तसेच तंत्रज्ञान समन्वयक यांनी सहभाग घेतला.कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी विविध पिकांवरील किड व रोगांची लक्षणे, त्यांची अचूक ओळख, शेतपातळीवरील निरीक्षण पद्धती तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालीसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार छायाचित्रांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. क्षेत्रीय माहिती संकलन करताना घ्यावयाची काळजीही त्यांनी स्पष्ट केली.यानंतर नचिकेत देशपांडे यांनी क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम (सीएचएमएस) ॲपच्या वापराबाबत प्रात्यक्षिक सादर केले. किड व रोगांच्या नोंदी, छायाचित्रे अपलोड करण्याची प्रक्रिया, माहितीची अचूक नोंद, डेटा संकलनातील दक्षता तसेच मोबाईल ॲपचा प्रभावी वापर याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींनी प्रत्यक्ष ॲपवर नोंदी करून त्याचा वापरही करून पाहिला.या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करता येणार असून पिकांवरील किड व रोगांचे अचूक निदान करून शेतकऱ्यांना वेळेत योग्य मार्गदर्शन देणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच महाविस्तार-एआय आणि सीएचएमएस प्रणालीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाधारित कृषी सेवा अधिक सक्षमपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाच्या शेवटी लक्ष्मण सावंत यांनी उपस्थित मान्यवर, प्रशिक्षक आणि सहभागी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप पवार (प्रकल्प विशेषज्ञ – मनुष्यबळ विकास), राजेश कोकाटे (लेखा सहाय्यक) तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *