
फेसबुकवरील क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष महागात; सावरगावातील ज्येष्ठाची ₹10.71 लाखांची सायबर फसवणूक
जळगाव जामोद | प्रतिनिधी
सोशल मीडियावरील आकर्षक गुंतवणुकीच्या जाहिरातींना बळी पडल्यामुळे सावरगाव येथील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ₹10 लाख 71 हजार 453.20 रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार भीकमचंद केला (वय 61), रा. सावरगाव, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा यांनी 26 जानेवारी 2026 रोजी फेसबुकवर क्रिप्टोकरन्सी (USDT) संदर्भातील जास्त परताव्याची जाहिरात पाहून त्यावरील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर परदेशी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधणाऱ्या “सुनील कुमार” नाव सांगणाऱ्या व्यक्तीने मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत तसेच नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे आश्वासन देत त्यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले.या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी 27 जानेवारी ते 2 मार्च 2026 या कालावधीत त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यातून विविध व्यवहारांद्वारे एकूण ₹10,71,453.20 इतकी रक्कम आरोपीच्या सांगण्यानुसार हस्तांतरित केली. मात्र, कोणताही नफा किंवा गुंतवणुकीचा परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यानंतर त्यांनी 4 मार्च 2026 रोजी NCCRP पोर्टलवर तक्रार दाखल केली. प्रारंभी हा गुन्हा सायबर पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे नोंदविण्यात आला होता. पुढील तपासात घटनास्थळ जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने गुन्हा हस्तांतरित करून कायम अप.क्र. 497/2026 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.नागरिकांसाठी पोलिसांचे आवाहनसोशल मीडियावर दिसणाऱ्या आकर्षक गुंतवणूक योजना, अल्पावधीत मोठा परतावा देण्याची हमी किंवा अनोळखी व्यक्तींकडून मिळणाऱ्या आर्थिक सल्ल्यावर विश्वास ठेवू नये. कोणतीही आर्थिक रक्कम गुंतवण्यापूर्वी संबंधित संस्थेची खातरजमा करावी. सायबर फसवणूक झाल्यास वेळ न दवडता 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा किंवा NCCRP पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जळगाव जामोद पोलिसांनी केले आहे
