
अकोट बस स्थानकाची दुरवस्था,चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य,प्रवाशांचे अतोनात हाल
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
येथील मुख्य बस स्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. तसेच बस स्थानकाचे संथ गतीने सुरू असलेल्या रखडलेल्या बांधकामामुळे प्रवाशांवर पावसात भिजण्याची वेळ आली आहे.चिखलाचे साम्राज्य आणि पाण्याचे कारंजे बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि आत येण्याच्या रस्त्यावरच मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे गढूळ पाणी साचले आहे. जेव्हा एखादी बस स्थानकात प्रवेश करते किंवा बाहेर पडते, तेव्हा या खड्ड्यांमधील घाण पाणी थेट रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. यामुळे नागरिकांचे कपडे खराब होत असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.अपुऱ्या जागेअभावी प्रवासी पावसात बस स्थानकाचे बांधकाम बऱ्याच दिवसांपासून रखडलेले आहे. बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे प्रवाशांना थांबण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी, मुसळधार पाऊस सुरू असताना प्रवाशांना डोक्यावर छप्पर मिळेनासे झाले आहे.चिमुकली बालके, वृद्ध महिला आणि अपंगांना या पावसात भिजत उभे राहावे लागत आहे, जे अत्यंत वेदनादायी आहे.संपूर्ण बस स्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.रस्त्यावरून चालताना पाय घसरून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः वृद्ध महिला, लहान मुले आणि आजारी प्रवाशांना या चिखलातून आणि पाण्यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे.अनेक ज्येष्ठ नागरिकांना येथे चालताना त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारावर प्रवाशांकडून तीव्र टीका होत आहे.*प्रतिक्रिया*तातडीने दुरुस्तीची मागणीएस.टी.प्रशासनाने आणि संबंधित कंत्राटदाराने या समस्येकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.बस स्थानकातील खड्डे त्वरित बुजवून,रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे.मुजीब शेखप्रवासी *प्रतिक्रिया*मी पायाने दिव्यांग असून मी बऱ्याच वेळा बस ने येजा करतो पण बस मधून खाली उतरल्या नंतर स्थानकावर धड चालता देखील येत नाही मोठे मोठे गड्डे त्यात साचलेले पाणी आणि दोन दिवस पूर्वी तर अपुऱ्या जागेमुळे मला पावसात भिजण्याची वेळ आली.संजय गीतेप्रवासी
