
बोर्डीत नैसर्गिक शेतीवर शेतकरी प्रशिक्षण,शाश्वत शेतीचा स्वीकार करा
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी श्री नागास्वामी महाराज मंदिर बोर्डी येथे नैसर्गिक शेती या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.उत्पादन खर्चात बचत,जमिनीचे आरोग्य संवर्धन आणि विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे यावेळी मार्गदर्शकांनी सांगितले.कार्यक्रमात विकास सर्ग समिती,अकोलाचे नागोराव भास्कर,कृषी सहायक ईश्वर बैरागी,पंढरी गायकवाड तसेच आत्माचे राहुल अडाणी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी जीवामृत,बीजामृत,आच्छादन,सेंद्रिय निविष्ठांचा वापर,मातीची सुपीकता टिकविण्याचे उपाय आणि शाश्वत शेती पद्धतींचे महत्त्व याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यासोबतच पर्यावरणाचेही संरक्षण होऊ शकते असे त्यांनी बोलतांना नमूद केले.यावेळी बोर्डीचे उपसरपंच राजेश भालतिलक,गोकुळ लटकुटे,धनराज धर्मे,विनोद पाटील गये,राजेश इस्थापे,निलेश राऊत,दिनेश ताडे,राजेश वाघमारे,रविंद्र आतकड,राम भालतिलक,विलास चेडे,संदीप वरणकार,आकाश राऊत,विजय राऊत,विवेक धर्मे,नागोराव कटाळे,विलास भालतिलक यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या अंमलबजावणी,सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती,उत्पादनक्षमता आणि बाजारपेठ यासंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित केले.तज्ज्ञांनी त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन करत शाश्वत,पर्यावरणपूरक आणि किफायतशीर शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
