
खामगाव, शेगांव आगाराच्या बसेस भोटा पर्यंत पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात याव्यात मनविसेचे खामगांव, शेगांव आगार प्रमुख यांना निवेदन
बसेस पुर्ववत सुरू न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा!! नांदुरा: तालुक्यातील भोटा येथील खामगांव, शेगांव आगाराच्या बसेस गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने भोटा व पंचक्रोशीतील विद्यार्थी, शेतकरी, व प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात आज ११ जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने खामगांव, शेगांव आगाराच्या आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच दिनांक २७ मार्च २०२६ रोजी खामगांव आगार प्रमुख यांना मनविसेने निवेदन सुद्धा दिले होते. परंतु सदर निवेदनाची दखल न घेतल्याने खामगांव आगार प्रमुख यांना स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी दोन्ही आगार प्रमुख यांच्याशी मनसे पदाधिकारी यांनी चर्चा केली असता त्यांनी सकारात्मकता दर्शवली व लवकरच सदर बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. सविस्तर बातमी अशी आहे की भोटा येथे खामगांव आगाराची बससेवा सकाळी ०८:३० ला व सायंकाळी ०६:३० ला येत होती. तसेच शेगांव आगाराची सुद्धा बससेवा भोटा येथे सकाळी १०:०० वाजता व सायंकाळी ०५:०० वाजता येत होती. परंतु जलंब रेल्वे उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने सदर बससेवा गेल्या वर्षभरापासून बंद होती. आता खामगांव, शेगांव आगाराच्या अनेक बसफेर्या जलंब , माटरगांव, भेंडवळ पर्यंत सुरू झालेल्या आहेत. अशातच भोटा येथील बससेवा बंद असल्याने येथील विद्यार्थी, शेतकऱ्यांना, श्री संत गजानन महाराज भक्तांना व इतरही प्रवाशांना शेगांव, खामगांव जाण्यासाठी खाजगी वाहनाने जावे लागते अशातच बससेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहन चालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहेत. त्यामुळे मनसे पदाधिकारी यांनी दोन्ही आगार प्रमुख यांना निवेदन दिले व यावेळी सकारात्मक चर्चा झाली. सदर

बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे.सदर निवेदन देते वेळी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शिवचरण पारस्कर, मनविसे जिल्हा सचिव राहुल चोपडे, मनसे खामगांव शहराध्यक्ष आकाश पाटील, मनसे शेगांव तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, शेगांव शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकार, शेगांव वाहतूक सेना शहराध्यक्ष राम इंगळे,विभाग प्रमुख धनंजय लोखंडे,भोटा सरपंच पती कडू भोटकर ज्ञानेश्वर नंदाने, समाधान शेगोकार, किरण शेगोकार, वैभव देशमुख,सागर लांजुळकर सह मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.
