घाबरू नका पोलिसांशी संपर्क साधा कारंजा पोलिसांकडून विद्यार्थिनींना आत्मसुरक्षेचे धडे

घाबरू नका पोलिसांशी संपर्क साधा कारंजा पोलिसांकडून विद्यार्थिनींना आत्मसुरक्षेचे धडे

कारंजा (घाडगे): शहरात वाढत्या छेडखानीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि शालेय विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कारंजा पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत, पोलीस स्टेशन कारंजा (घा.) तर्फे विशेष ‘जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पोलीस प्रशासनाने विद्यार्थिनींना त्यांच्या हक्कांची आणि सुरक्षिततेची जाणीव करून दिली.या उपक्रमादरम्यान प्रल्हाद मदन यांनी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधला. शाळा आणि कॉलेजमध्ये ये-जा करताना जर कोणी विनाकारण छेड काढत असेल किंवा वाईट उद्देशाने पाठलाग करत असेल, तर विद्यार्थिनींनी घाबरून न जाता त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.शाळा व कॉलेज सुटल्यानंतरच्या काळात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. छेडखानी करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करण्यास सज्ज असून, अशा समाजकंटकांचा बंदोबस्त केला जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष ‘दामिनी’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक शाळा परिसर, बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी बारीक लक्ष ठेवून आहे. विद्यार्थिनींना सार्वजनिक ठिकाणी किंवा बसमध्ये प्रवास करताना कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांनी त्वरित या पथकाला किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे. पोलिसांकडून या पथकाचा संपर्क क्रमांक देखील विद्यार्थिनींना देण्यात आला आहे, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळणे सोपे होईल.बसमध्ये चढताना किंवा उतरताना तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना विद्यार्थिनींनी आपल्या मौल्यवान सामानाची योग्य काळजी घ्यावी, अशी सूचनाही पोलिसांकडून करण्यात आली. समाजात सुरक्षिततेचे वातावरण राहावे आणि गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी पोलीस प्रशासनाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या जनजागृती मोहिमेमुळे शालेय विद्यार्थिनींमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला असून, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *