
रात्रीची सिंगल फेज सहा वाजता सुरू करण्यासाठी
स्वाभिमानीचे वडजी सबस्टेशनवर टेंभा आंदोलन; महावितरणला १५ दिवसांचा अल्टिमेटम
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर, : वडजी, हरणखेड, आळंद आणि माळेगाव परिसरातील शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना रात्री १० वाजेपर्यंत अंधारात राहावे लागत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वडजी उपकेंद्रावर (सबस्टेशन) सोमवारी आक्रमक टेंभा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महावितरण प्रशासनाला अखेर लेखी आश्वासन द्यावे लागले.
या परिसरातील सुमारे २०० ते ३०० शेतकरी कुटुंबे शेतात वास्तव्यास आहेत. मात्र महावितरणच्या विद्यमान वेळापत्रकानुसार रात्री १० वाजता सिंगल फेज वीजपुरवठा सुरू होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजताच सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्थानिक शेतकऱ्यांनी केली.

मागणी मान्य होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वडजी उपकेंद्रावर टेंभा आंदोलन छेडले. हे आंदोलन तब्बल तीन ते चार तास सुरू होते. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. अखेर चर्चेनंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येत्या १५ दिवसांत सिंगल फेज वीजपुरवठा रात्री ६ वाजता सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी इशारा देताना सांगितले की, “महावितरणने दिलेले लेखी आश्वासन पाळले नाही तर यापेक्षाही तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडले जाईल. शेतकरी व ग्रामीण नागरिकांना अंधारात ठेवण्याचा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही.”
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, मलकापूर तालुकाध्यक्ष गोपाल सातव, वडजी शाखाध्यक्ष पराग बोंडे, हरणखेड शाखाध्यक्ष विश्वनाथ होले, प्रशांत राजपूत अनंता खडसे, अनंता भारंबे, गजानन बोंडे, हरणखेडचे माजी सरपंच ज्ञानदेव खाचणे, वैभव करांडे, प्रकाश नारखेडे, संदीप खाचणे, ओंकार राणे, जगदीश फिरके, राहुल इंगळे, नितीन खाचणे, हर्षल नारखेडे अरुण चोपडे गणेश गायकवाड सुनील सुपे तेजस वासतकार संजय तायडे शरद इंगळे अक्षय पाटील कुंदन पाटील पिंटू भारंबे प्रमोद बराटे पृथ्वीराज राजपूत निलेश नाफडे नितीन राजपूत निलेश दांडगे या सह शेकडो शेतकरी हजर होते.
