अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिबिर संपन्न

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शिबिर संपन्न

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी देवधाबा व हिंगणाकाझी परिसरात आयोजित विशेष पशू आरोग्य शिबिरास पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पशुधन पर्यवेक्षक डॉ. रघुनाथ फोपसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिरात शेळ्या-मेंढ्यांचे लसीकरण, जंतनिर्मूलन व पशुपालकांना विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत पशुवैद्यकीय चिकित्सालय, देवधाबा यांच्या वतीने हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील पशुधनाचे आरोग्य सुदृढ राखणे आणि पशुपालकांना तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शिबिरात शेळ्या-मेंढ्यांची आरोग्य तपासणी करून जंतनाशक औषधोपचार करण्यात आले. तसेच आंत्रविषार, घटसर्प आणि पीपीआर यासारख्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षणासाठी मान्सूनपूर्व

लसीकरणमोहीमही राबविण्यात आली. आजारी पशुधनावर आवश्यक उपचार करण्यात आले असून पशुपालकांना पशुसंवर्धन विषयक विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शासनाच्या पशुसंवर्धन योजनांची माहिती देण्यात आली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. रघुनाथ फोपसे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या पुढाकारामुळे परिसरातील अनेक मेंढपाळ व पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवांचा थेट लाभ मिळाला. पशुधनाचे आरोग्य जपण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून भविष्यातही अशाच जनहिताच्या योजना राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *