
26 वर्षांनंतर माजी विद्यार्थी व शिक्षकांचे स्नेहसंमेलन उत्साहात
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव )
स्थानिक नाथुरिम नारायणदास मुंदडा विद्यालयाच्या बॅच 2000 च्या माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचे भव्य स्नेहसंमेलन नुकतेच अत्यंत उत्साहपूर्ण पार पडले. सव्वीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील क्षण पुन्हा अनुभवले. या स्नेहसंमेलना साठी तब्बल 160 माजी विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे विद्यालयातील माजी शिक्षकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात गोपी खंडेलवाल यांच्या प्रस्तावनेने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश तारे तसेच सुमित खिल्लारे यांनी प्रभावी शैलीत करत संपूर्ण कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. यावेळी शामसुंदर मुंदडा, राम मुंदडा, आशिष मुंदडा, जगदीश बळी, लक्ष्मण ढोबळे, जयसिंग घुगे हे संस्थेचे संचालक यांच्या उपस्थितीत तसेच विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या एकोप्याचे कौतुक करत समाजामध्ये सकारात्मक कार्य करत राहण्याचे आवाहन केले. तसेच जुन्या विद्यार्थ्यांनी शाळेशी कायम नाते जोडून ठेवावे, असेही मत व्यक्त करण्यात आले.

या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने बॅच 2000 तर्फे विद्यालय परिसरातील वृक्षारोपण उपक्रमासाठी 5100 रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश यामधून देण्यात आला. कार्यक्रमात गुरुजनांचा सत्कार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सुंदर गाणी, मनोरंजन उपक्रम, जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पा तसेच मित्र-मैत्रिणींचे मनोगत यामुळे वातावरण भावनिक झाले होते. अनेक वर्षांनी भेट झाल्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध समित्यांनी अत्यंत जबाबदारीने काम केले. पूनम गट्टाणी (लुनावली) यांनी विशेषतः महिला मित्र-मैत्रिणींशी संपर्क साधून त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच सुधीर सारडा यांनी आयोजित केलेल्या मजेशीर गेम्स आणि उपक्रमांनी उपस्थितांचे विशेष मनोरंजन केले. दूरवरून प्रवास करून आलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सागर भुतडा यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बॅच 2000 च्या आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
