
मेडशीचा बंद पडलेला कोंडवाडा पुन्हा सुरू करा मागणी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
ग्रामीण भागात मोकाट जनावरांमुळे पिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी मेडशी ग्रामपंचायत अंतर्गत असलेला जुना बंद पडलेला जनावरांचा कोंडवाडा दुरुस्त करून तो पुन्हा कार्यान्वित करावा, अशी मागणी मेडशी येथील रहिवासी व शेतकरी इरफान भाई रेघीवाले यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.मालेगाव तालुक्यातील मेडशी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व प्रशासक मंडळाला एक रीतसर लेखी निवेदन सादर केले आहे.
मेडशी परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत आहेत. ही जनावरे पिकांचे अतोनात नुकसान करत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. रात्रं-दिवस मेहनत करून उभी केलेली पिके या जनावरांच्या त्रासामुळे उद्ध्वस्त होत आहेत.
जुना कोंडवाडा दुरुस्त करण्याची मागणी

मेडशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये पूर्वी जनावरांचा कोंडवाडा होता, परंतु सध्या तो जमीनदोस्त होत असून बंद अवस्थेत आहे. हा कोंडवाडा पुन्हा दुरुस्त करून तातडीने सुरू करण्यात यावा, जेणेकरून शेतात घुसणारी व पिकांचे नुकसान करणारी मोकाट जनावरे पकडून त्या कोंडवाड्यात डांबता येतील. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी आग्रही विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
यावर प्रशासन काय सकारात्मक पाऊल उचलते, याकडे आता संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
