
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना आक्रमक; विजय साठे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला निवेदन मलकापूर तालुक्यातील चोरीला गेलेल्या विद्युत तारा तात्काळ बसविण्याची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर, दि. १८ मे :मलकापूर तालुक्यातील शेतशिवारातून चोरीला गेलेल्या विद्युत तारा तात्काळ पुन्हा बसवून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.मलकापूर तालुक्यातील अनेक गावांमधील शेतशिवारात गेल्या काही महिन्यांपासून विद्युत तारा चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या चोरीमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल आणि पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका आदी पिकांना पाणी मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन घटले असून आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.आता खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली असून कापूससह विविध पिकांच्या लागवडीसाठी तयारी सुरू केली आहे. मात्र शेतातील वीजपुरवठाच बंद असल्याने विहिरीत व बोअरवेलमध्ये पाणी असूनही त्याचा उपयोग करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.या गंभीर पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देत महावितरण प्रशासनासमोर ठाम भूमिका घेतली. “शेतकरी आधीच नैसर्गिक संकटे,

उत्पादन खर्च आणि बाजारभावाच्या प्रश्नांमुळे त्रस्त आहे. अशा वेळी वीजपुरवठा खंडित राहणे म्हणजे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसणे होय. प्रशासनाने तातडीने चोरीला गेलेल्या तारा युद्धपातळीवर बसवून शेतातील वीजपुरवठा सुरू करावा,” अशी मागणी साठे यांनी केली.निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, खरीप पेरणीपूर्वी विद्युत तारा बसवून वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला.यावेळी शेतकरी विनोद बोदडे, प्रशांत गायकवाड, सोपान बोदडे,संतोष गायकवाड, पंकज वाघ, प्रविण एखंडे, सचिन इंगले, बाळू धनके, सोपान पाटिल, भास्कर बोदड़े, गजानन बोदडे, वासुदेव सोनोने, हरिभाऊ मानकर, मधुकर डोसे, विनोद चोपडे,आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, शहर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आली.चौकट :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विजय साठे पुन्हा आक्रमकमलकापूर तालुक्यातील स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत महावितरण प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचा वीजप्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
