
गणेश विसर्जन मिरवणुकीत DJ-डॉल्बीवर पूर्ण बंदी! नियम मोडल्यास थेट गुन्हा दाखल होणार; SP अर्चित चांडक यांचे शांतता समितीत कडक निर्देश
अकोट शहर व तालुका प्रतिनिधी : शिवा मगर मो 9922833064
अकोट : आगामी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरात डीजे, डॉल्बी साऊंड आणि मॉडिफाइड साऊंड सिस्टीमच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशान्वये ही बंदी लागू करण्यात आली आहे.या संदर्भात अकोट येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिकांना कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.”विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणीही डीजे अथवा डॉल्बी साऊंडचा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिला.गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी सर्व गणेश मंडळे व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.या बैठकीला सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, तहसीलदार सुनील चव्हाण, मुख्याधिकारी शशिकांत बाबर, अकोट शहरचे ठाणेदार किशोर जुनघरे, अकोट ग्रामीणचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांच्यासह गणेश मंडळ आणि शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
