
मालेगाव शाखा संचालकपदासाठी तिरंगी लढत
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि, २० दि, अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव बँक संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची बुधवार, १८ मार्च ही अंतिम तारीख असताना अंतिम तारखेला मालेगाव शाखा संचालक पदासाठी दोन जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे त्यामुळे आता बँकेच्या संचालक पदासाठी नितीन दिलीप जाधव, गोपाल पाटील राऊत व प्रकाश पाटील कुटे या तिघा उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने मालेगाव शाखा संचालक पदाची निवडणूक ही अखेर तिरंगी ठरली आहे.

मालेगाव तालुका राजकारणात जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह बँक निवडणूक ही अतिशय महत्त्वाची ठरली असून, होणारी ही निवडणूक अटीतटीची व काट्याच्या लढतीची होणार ही शक्यता असताना या निवडणुकीकरिता मालेगाव शाखा संचालकपदाकरिता एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.अर्ज मागे घेण्याची आजची १८ मार्च ही अंतिम तारीख असताना अंतिम तारखेला अॅड., रवींद्र गवळी, राजू चंदू जाधव या दोघा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत नितीन दिलीप जाधव, गोपाल पाटील राऊत, तसेच प्रकाश पाटील कुटे या तिघा उमेदवारांचेअर्ज कायम राहिले असल्याने निवडणूक रिंगणात आता तिन्ही उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहे. त्यामुळे होणारी ही निवडणूक तिरंगी ठरली आहे.

मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे मतदान रविवार, २९ मार्च रोजी असून या निवडणूक प्रचाराला आता वेग आला आहे तर उमेदवारांसह त्यांचे समर्थक, कार्यकर्ते तसेच राजकीय नेते मंडळीही जोमाने प्रचाराला भिडली आहे. या निवडणुकीत साम, दाम, दंड या भेदनीतीचा वापर केल्या जात असून निवडणुकीकरिता आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता असून तशी चर्चाही तालुक्यात सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणुकीकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये माजी संचालक प्रकाश पाटील कुटे व विद्यमान संचालक दिलीप जाधव हे एक मेकाच्या विरुद्ध असताना यामध्ये दिलीप जाधव दोन मताने निवडून आले होते, यावेळी माजी संचालक प्रकाश पाटील कुटे, तसेच विद्यमान संचालक दिलीप जाधव यांनी आपल्या मुलास नितीन दिलीप जाधव यांना उमेदवारी दिली असून, तसेच तिसरे उमेदवार म्हणून गोपाल पाटील राऊत हे उभे आहेत या तिरंगी लढतीमध्ये संचालकासाठी उभे असलेले तिन्ही उमेदवाराचा दांडगा संपर्क असून सर्वच उमेदवारांनी तालुक्यातील ८८ मतदारांना भेटले असून संपर्कात आहेत उमेदवार येणाऱ्या २९ तारखेला मतदान झाल्यानंतर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल हे चित्र, ३० मार्च ला असलेल्या मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल, याकडे सर्व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे
