वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवावा शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप पाटील कुटे

वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवावा शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप पाटील कुटे यांची
महावितरणकडे मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)

दि,१८ :-हवामान विभागाने १६ ते २३ मार्च या कालावधीत वादळी वारे व पावसाची शक्यता वर्तविल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहर व तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप पाटील कुटे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) मालेगाव येथील उपअभियंता यांना निवेदन देऊन नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वादळी वाऱ्याच्या काळात झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर घासल्यामुळे किंवा तुटून पडल्यामुळे वारंवार ट्रिपिंग, शॉर्टसर्किट किंवा वीज खांब कोसळण्यासारख्या घटना घडतात. त्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते तसेच जीवितहानीची शक्यताही निर्माण होऊ शकते.या पार्श्वभूमीवर वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटून ट्री-कटिंग करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप पाटील कुटे यांनी केली आहे. तसेच वादळी वारे सुरू असताना तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी महावितरणने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन शहर व तालुक्यातील नागरिकांना विनाअडथळा वीज सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, वाशिम यांनाही पाठविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *