आचार्य प्रफुल्लचंद्र रे जयंती उत्साहात साजरी

आचार्य प्रफुल्लचंद्र रे जयंती उत्साहात साजरी

अकोला जिल्हा प्रतिनिधी देवानंद खिरकर

आकोट श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय रसायनशास्त्राचे जनक, महान वैज्ञानिक, उद्योगपती आणि समाजसुधारक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची प्रेरणा आणि स्वदेशी उद्योगांच्या उभारणीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एच. पांडे हे होते. यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. बी. आंधळे यांनी आचार्य रे यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी भारतातील आधुनिक रसायनशास्त्राच्या विकासात दिलेले अमूल्य योगदान, बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स या भारतातील पहिल्या स्वदेशी रासायनिक उद्योगाची स्थापना, संशोधनातील त्यांचे योगदान तसेच विज्ञानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीची त्यांनी जोपासलेली भूमिका यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी संशोधनाची आवड जोपासून नवनवीन शोधांद्वारे समाजाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अब्दुल वाजिद यांनी केले. त्यांनी आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, राष्ट्रभक्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम यांचा उल्लेख करून त्यांचे जीवन आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा उपयोग केवळ पदवी मिळविण्यासाठी न करता समाजहितासाठी करावा, संशोधन संस्कृती विकसित करावी आणि नवनिर्मितीची वृत्ती जोपासावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास प्रा. आदित्य जोशी, प्रा. चेतन सोये, प्रा. कु. भाग्यश्री हाडोळे, कु. प्रणिता रेखाते, कु. निकिता जयस्वाल रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. चंद्रशेखर लाडोळे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *