खरीप 2025 पीक विमा रखडला, हमीभाव खरेदी नाही संग्रामपूरच्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.

खरीप 2025 पीक विमा रखडला, हमीभाव खरेदी नाही संग्रामपूरच्या शेतकऱ्यांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा.

संग्रामपूर (प्रतिनिधी)

संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले असून मक्का हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी आणि खरीप 2025 चा पीक विमा रखडणे या दोन्ही प्रश्नांवर संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी संग्रामपूर तहसील कार्यालयात तहसीलदारांना व त्यांच्या मार्फत कृषी आयुक्त पुणे यांना निवेदन देत दोन्ही गंभीर प्रश्नांकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली.शासनाने मक्का व हरभरा पिकासाठी ₹2400 प्रति क्विंटल व हरभरा 5800 रु हमीभाव जाहीर केला असतानाही संग्रामपूर तालुक्यात प्रत्यक्षात मक्का ₹1200 ते ₹1500 व हरभरा 5000 ते 5200 रु या अत्यंत कमी दराने खुल्या बाजारात खरेदी होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तालुक्यात स्वतंत्र शासकीय मक्का व हरभरा खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने व्यापाऱ्यांना कमी दरात मक्का विकावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संग्रामपूर येथे तात्काळ शासकीय मक्का, हरभरा खरेदी केंद्र सुरू करून सर्व शेतकऱ्यांचा मक्का हरभरा हमीभावाने खरेदी करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.दुसरीकडे खरीप 2025 च्या पीक विम्याबाबतही शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप आहे. अतिवृष्टीमुळे किमान 60% पीक नुकसान झाल्याचे शासनाने अधिकृतपणे मान्य केले असून त्यावर आधारित आर्थिक मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र त्याच नुकसानीच्या आधारावर पीक विमा देण्यात येत नसल्याने हा सरळसरळ विरोधाभास व शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला.महसूल मंडळाच्या उत्पन्नावर आधारित अट लावून वैयक्तिक शेतातील प्रत्यक्ष नुकसानीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे वैयक्तिक नुकसानीच्या आधारे पीक विमा तात्काळ अदा करावा आणि महसूल मंडळाच्या उत्पन्नाची अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट 7 दिवसांचा अल्टिमेटम देत सांगितले की, मागण्यांवर निर्णय झाला नाही तर संग्रामपूर तालुक्यात तीव्र आंदोलन, रास्ता रोको, तहसील घेराव व जिल्हास्तरीय आंदोलन उभारले जाईल.दरम्यान, निवेदन देताना हमीद भाई पाशा, विजय मारोडे, विजय ठाकरे, अक्षय शिरसोले, दशरथ वानखडे, अशोक भिवटे, अशपाक भाई देशमुख, गजानन वेरुळकर, भास्कर दाभाडे, शरद आढाव, संदीप मोरखडे, विश्वनाथ वेरुळकर, गणेश बोंबटकार, सचिन वानखडे, विठ्ठल गोतमारे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी आता प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून असून, मक्का हमीभाव आणि पीक विमा या दोन मुद्द्यांवर पुढील काही दिवसांत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *