
श्रीक्षेत्र मढी, चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रेला सुरुवात कैकाडी समाजाची मानाची ( काठी ) तसेच गोंधळी समाजाची (होळी) आणि निशाणभाविकांनी यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-माजी उपसरपंच जाधव
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
दि,१ :–अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे नवनाथांपैकी एक मानले जाणारे चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रा महोत्सवाची मंगल सुरुवात झाली आहे. दि. १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेला हा सोहळा १९ मार्चपर्यंत भक्तिभावात पार पडणार असून, २ मार्च रोजी यात्रेचा प्रमुख कार्यक्रम पार पडणार आहे.या दिवशी कैकाडी समाजाची मानाची ‘काठी’ तसेच गोपाळ समाजाची मानाची ‘होळी’ आणि ‘निशाण’ गडावर चढविण्याची परंपरा पार पाडली जाणार आहे. या सोहळ्याला धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या विशेष महत्त्व असून राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परभणी जिल्ह्यातील काठीचे मानकरी, कैकाडी समाज मानकरी मंडळाचे सचिव ,नगरसेवक पूर्णी सुनील जाधव, व माजी उपसरपंच अनिल जाधव अमानी यांनी विदर्भातील , मराठवाड्यातील,कैकाडी समाजबांधव, भटके-विमुक्त जाती-जमाती तसेच अठरा पगड जातीतील कानिफनाथ भक्तांनी यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.मढी हे नाथ संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. येथेच कानिफनाथ महाराजांचे समाधीस्थळ असून, यात्रा काळात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाही मोठ्या प्रमाणावर भक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे. दि. ८ मार्च रोजी रंगपंचमीच्या निमित्ताने नाथांचा समाधीदिन सोहळा साजरा करण्यात येणार असून, या दिवशी यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. तसेच भटके-विमुक्त समाजाची पारंपरिक ‘मढी पंचायत’ येथे भरते. वर्षभरातील विविध सामाजिक वाद-विवाद यावेळी चर्चेतून मार्गी लावले जातात.यात्रेदरम्यान भरणारा गाढवांचा पारंपरिक बाजारही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. रंगपंचमीच्या सुमारास हजारो गाढवांची खरेदी-विक्री होत असल्याने या यात्रेला व्यापारी दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मराठवाड्यातील सर्व समाजबांधवांनी भक्तिभावाने आणि उत्साहात या ऐतिहासिक यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक सुनील जाधव, यांच्यासह अनिल जाधव यांनी केले आहे.
