
रामा इंटरनॅशनल शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
वाशिम जिल्हा प्रतिनिधी (उमेश लहाने)
रामा इंटरनॅशनल स्कुल वाशीम येथे विविध शैक्षणिक व प्रात्यक्षिक उपक्रमांच्या माध्यमातून विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधनाची आवड वाढावी आणि दैनंदिन जीवनातील विज्ञान समजावे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ कोचिंग क्लासेस, वाशीम चे संस्थापक श्री. अजय नंदापुरे सर व कौशिक काष्टे सर तसेच शाळेचे व्यवस्थापक अमित जयस्वाल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दुर्गा कढणे मॅडम विराजमान होत्या. दीपप्रज्वलन व सि वी रमण यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विज्ञान दिनानिमित्त शाळेत भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक विषयांवर आधारित आकर्षक मॉडेल्स सादर केली. सौरमाला, जलचक्र, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया,मानवी ह्रदयाचे कार्य तसेच किडनी चे कार्य,पर्यावरण संरक्षण, ज्वालामुखी मॉडेल, पवनऊर्जा प्रकल्प, तसेच नदी स्वछता मॉडेल प्रकल्प इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी कल्पकतेने प्रात्यक्षिके सादर केली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मॉडेलमागील वैज्ञानिक तत्त्वे आत्मविश्वासाने स्पष्ट केली.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत विज्ञान विषयातील जिज्ञासा जपण्याचे आवाहन केले. “विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून प्रत्यक्ष प्रयोगातून समजणारी प्रक्रिया आहे,” त्याबरोबरच निसर्ग सवर्धन करून विज्ञान शिकावे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यकाळात संशोधक, अभियंते व वैज्ञानिक बनून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असा संदेश दिला.
प्राचार्या दुर्गा कढणे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे मार्गदर्शन केले. शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रदर्शनी यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. कार्यक्रमाचे संचलन अर्णव गंगाधर गोरे व इशिता शिवाजी आढाव या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन ख़ुशी मोतीराम वायसाळ हिने केले एकूणच, राष्ट्रीय विज्ञान दिनाचा हा उपक्रम प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरला.
