मलकापूर तहसील मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

मलकापूर तहसील मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर : हमीभाव जाहीर करूनही प्रत्यक्ष खरेदी केंद्रे बंद ठेवत शेतकऱ्यांना बाजाराच्या दयेवर सोडणाऱ्या शासना विरोधात आज २६ फेब्रुवारी रोजी मलकापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय परिसरात भरलेल्या ट्रॅक्टर मधील मूठ-मूठ मका फेकून शासनाच्या धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांतला आक्रोश स्पष्ट दिसून आला. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी सरकारवर थेट आरोप करत सांगितले की, “सरकारने २४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला; पण बाजारात व्यापारी १३०० ते १४०० रुपयांत मका खरेदी करीत आहेत. म्हणजेच प्रति क्विंटल सुमारे हजार रुपयांची उघडी लूट शेतकऱ्यांच्या घामातून होत आहे. सरकार व्यापाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना लुबाडत आहे.” तालुक्यातील हजारो क्विंटल मका अजूनही शेतकऱ्यांच्या घरात साठून पडला आहे. कर्जफेड, बियाणे, खत आणि घरखर्चाच्या चिंतेत असलेला शेतकरी हमीभावाच्या आशेवर बसला; पण केंद्रेच सुरू न झाल्याने तो पुन्हा व्यापाऱ्यांच्या दारात उभा ठाकला आहे. “शेतकऱ्यांच्या घरातून मका बाहेर गेला कीच भाव वाढतात आणि मग हमीभाव केंद्रे सुरू होतात, हा नेमका कोणाच्या फायद्याचा खेळ आहे?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. तहसील आवारात मका मालाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला हिरव्या मक्याचे धांडे आणि कणसे बांधून, विविध फलक लावून आणि तीव्र घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. वातावरणात रोष होता; पण त्या रोषामागे उपजीविकेची हाक अधिक तीव्र होती.घोषणांची दखल घेत तहसीलदार समाधान सोनवणे तातडीने आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून “तुमची समस्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू,” असे आश्वासन दिले. मात्र आश्वासनांवर आता विश्वास उरलेला नाही, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत होती. “आठ दिवसांत मका खरेदी सुरू झाली नाही, तर तहसील कार्यालयावर धडक देऊन अधिक उग्र आंदोलन छेडू,” असा इशारा नारखेडे यांनी दिला. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा स्पष्ट संदेश आंदोलनातून देण्यात आला. या आंदोलनात बाळू ठाकरे, गोपाल सातव, रामदास डोसे, गोलू पाटील, श्रीकृष्ण म्हैसागर, शरद लांडे, प्रवीण राणे, दीपक पाटील, सतीश पाटील, दिलीप घाटे, तेजराव पाटील यांच्यासह हजारो शेतकरी सहभागी झाले होते. हमीभाव हा कागदावरील आकडा न राहता प्रत्यक्ष खरेदीत उतरला पाहिजे, हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या घामाला भाव नाही, अशीच परिस्थिती राहील आणि हा संताप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे आजच्या आंदोलनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *