गौलखेड रोडवर घाणीचे साम्राज्य नगरपरिषद झोपेत नागरिक संतप्त

गौलखेड रोडवर घाणीचे साम्राज्य; नगरपरिषद झोपेत, नागरिक संतप्त

प्रतिनिधी :(गजानन ददगाळ)

शेगाव : गौलखेड वरून शेगाव शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यालगत मागील महिनाभरापासून कचऱ्याचे ढीग साचून अक्षरशः घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधीमुळे शाळा, कॉलेज आणि हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज नाक दाबून प्रवास करावा लागत आहे, तर सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांचीही मोठी गैरसोय होत आहे.
रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला ओला-सुक्या कचऱ्याचा ढिगारा दिवसेंदिवस वाढत असून परिसरात डास, माशा आणि भटक्या प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असतानाही प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, शहरात स्वच्छतेचे दावे करणाऱ्या Shegaon Municipal Council कडून या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
“विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे का?” असा सवाल उपस्थित करत स्थानिकांनी तात्काळ साफसफाई करून नियमित कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
आता प्रशासन जागे होणार की घाणीच्या ढिगाऱ्याखाली जबाबदारीही गाडली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *