
चिखलीत अवैध गुटखा विक्री जोमात अवैध गुटखा, तंबाखू व नशेच्या पदार्थांच्या खुलेआम विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम
जावेद शाह संपादक
चिखलीः शहर व तालुक्यात सुरु असलेल्या अवैध गुटखा, तंबाखू व नशेच्या पदार्थांच्या खुलेआम विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून विशेषतः तरुण व अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लब्बैक मायनॉरिटी अँड मल्टीपर्पज सोसायटी, चिखली यांच्या वतीने बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून अवैध गुटखा विक्रीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र शासनाने गुटखा, सुगंधित तंबाखू व तत्सम नशेच्या पदार्थांवर संपूर्ण बंदी घातलेली असतानाही चिखली शहरातील अनेक भागांमध्ये लपूनछपून तसेच काही ठिकाणी सर्रासपणे अवैध विक्री सुरु आहे. कायद्याची पायमल्ली करणाऱ्या या विक्रीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सोसायटीचे पदाधिकारी शोएब अहमद शाह यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, अवैध गुटखा विक्रीमुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाकडे वळत असून अनेक विद्यार्थी आणि युवक व्यसनाच्या आहारी जात आहेत. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर, शिक्षणावर तसेच सामाजिक जीवनावर होत आहे. ही बाब केवळ आरोग्याशी संबंधित नसून कायदा व सुव्यवस्थेचा देखील गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, शहरातील पानठेले, किराणा दुकाने, टपऱ्या तसेच काही बंदिस्त ठिकाणी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची माहिती नागरिकांकडून वारंवार मिळत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने विशेष तपास मोहीम राबवून अशा विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, त्यांचे साहित्य जप्त करावे व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. यासोबतच भविष्यात अशा अवैध प्रकारांना आळा बसावा यासाठी नियमित तपास, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई तसेच जनजागृती मोहीम राबवावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने वेळेत ठोस पावले उचलली नाहीत तर समाजातील आरोग्यदायी वातावरण धोक्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.लब्बैक मायनॉरिटी अँड मल्टीपर्पज सोसायटीने पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक व तत्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली असून, चिखली शहराला नशामुक्त करण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
