सैलानी बाबा यात्रेच्या तयारीला वेग,बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा

सैलानी बाबा यात्रेच्या तयारीला वेग,बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा

सहसंपादक जावेद शहा

बुलडाणा तालुक्यातील मौजे पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबा दर्गा परिसरात साजऱ्या होणाऱ्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाच्या तयारीला गती आली आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची आढावा बैठक त्यांच्या कार्यालयात मंगळवारी घेण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सैलानी बाबा यात्रा महोत्सव 25 फेब्रुवारी ते 12 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. यात्रेदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.2 मार्च 2026 रोजी नारळाची होळी पेटविण्यात येणार असून, त्यानंतर यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. 8 मार्चला (पंचमी) संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक ग्रामपंचायत पिंपळगाव सराई येथून मुजावर परिवाराच्या संदल घरातून रात्री 8 वाजता निघून गावातील प्रमुख मार्गांवरून परिक्रमा करत जंगलगाठ रस्त्याने सुमारे 4 किमी अंतर पार करून रात्री 12 वाजता सैलानी बाबा दर्गा येथे पोहोचेल. 12 मार्च रोजी फातेखानी नंतर सैलानी बाबा ट्रस्टकडून प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता होईल.
सैलानी बाबा दर्गा हे सर्व जाती-धर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने यात्रेत बुलडाणा जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील आंध्रप्रदेश,तेलंगाणा, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात. यंदा अंदाजे 5 ते 7 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *