
डॉक्टर होमी भाभा बाल विज्ञान परीक्षा अंतर्गत प्रॅक्टिकल परीक्षेसाठी पात्र ठरलेले आपल्या सवना
जावेद शहा (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे यश गावासाठी आणि संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करताना मनापासून आनंद वाटला.यश चोपडे, चैताली खेडेकर, भाग्यश्री भुतेकर, दिपाली माने, रणवीरसिंग भुतेकर व अनुष्का भुतेकर या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि गुणवत्तेने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. त्यांच्या या यशामागे मुकीम पटेल मुख्याध्यापक, प्रवीण सोनाळकर,सोमकांत साखरे, इतर सर्व शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे.हे यश त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरो, विज्ञान क्षेत्रात ते आणखी मोठी उंची गाठो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गावातील इतर विद्यार्थ्यांनाही या यशातून नवी उमेद आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.विद्यार्थी हेच उद्याचे सशक्त भविष्य आहेत, या ठाम विश्वासातून मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्याचा आमचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पालक व गावकऱ्यांना मनापासून आवाहन आहे की त्यांनी आपल्या पाल्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच घ्यावे; कारण या शाळांना सक्षम, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण बनवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.भविष्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा मानस असून, डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले जाईल.
