
सुखापुरी मंडळात बिबट्याची दहशत; शेतकरी त्रस्त, दिवसा वीजपुरवठ्याची मागणी
सुखापुरी (प्रतिनिधी):जावेद शहा :- सुखापुरी मंडळात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली असून शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. शेतीच्या कामात व्यस्त असताना तसेच रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचाली वाढल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः कुक्कडगांव येथे मोठ्या प्रमाणावर जलसाठा असलेले धरणं आहे तसेच धरणा लगत वेड्या बाभळी च जाळं निर्माण झाले आहे ऊसाचं क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने व शेतालगत असलेल्या दाट झाडी मुळे बिबट्या असल्याचे प्रकार समोर आले असून, रात्री सुरू असलेल्या वीजपुरवठ्यामुळे शेतात काम करणे धोकादायक बनले आहे. शेतकरी जिव मुठीत घेऊन रात्री च्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी व ऊस लागवड करता जावं लागतं त्यामुळे सुखापुरी मंडळातील शेतकरी अधिकच त्रस्त झाले आहेत.
जोपर्यंत बिबट्याच्या हालचाली कमी होत नाहीत, तोपर्यंत तरी महावितरणने रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात परिसरातील शेतकरी एकत्र येऊन चर्चा करताना दिसून येत आहेत.
दरम्यान, या गंभीर बाबीकडे प्रशासन लक्ष देणार की दुर्लक्ष करणार, याकडे सुखापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वनविभाग व महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
