अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नवनिर्वाचित नगराध्यक्ष देवयानी कुलकर्णी विजयी

अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025
नवनिर्वाचित नगराध्यक्ष देवयानी कुलकर्णी विजयी: भाजपाला स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तिन वेळा मंत्री तसेच पाच वेळा आमदार राहिलेले माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा दारुन पराभव

जावेद शहा जालना जिल्हा प्रतिनिधी : – अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत नगरपरिषदेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या उमेदवार सौ. देवयानी केदार कुलकर्णी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून नगराध्यक्षपद पटकावले आहे. या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे नेते, तिन वेळा मंत्री व पाच वेळा आमदार राहिलेले राजेश टोपे यांना राजकीयदृष्ट्या मोठा फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत सौ. देवयानी कुलकर्णी यांना १३ हजार ४२३ मते मिळाली, तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवार श्रद्धा शिवप्रसाद चांगले यांना ७ हजार ५१६ मते मिळाली. शिवसेनेच्या उमेदवार सना मुस्तकीम पटेल यांना ९८८ मते मिळाली असून अपक्ष उमेदवार वंदना कांबळे यांना ३१२ व दर्शना खरात यांना २०५ मते मिळाली. मोठ्या मताधिक्यामुळे देवयानी कुलकर्णी यांचा विजय निर्विवाद ठरला.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही भाजपने सर्वाधिक प्रभागांत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. प्रभाग क्रमांक ०१ मधून भाजपच्या ज्योती कृष्णा बाबर व गंगाधर मच्छिंद्र वराडे, प्रभाग ०२ मधून उज्ज्वल देविदास कुचे व सविता सौरभ कुलकर्णी, तर प्रभाग ०३ मधून भाजपचे विश्वजीत विलासराव खरात व ताराबाई बबनराव शहाणे विजयी झाले. प्रभाग ०४ मधून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) चे अर्जुन नारायण भोजणे व अस्मा परवीन अफरोज पठाण यांनी विजय मिळवला. प्रभाग ०५ मधून भाजपचे बंडू साहेबराव जाधव व मंगल दिलीप खरात विजयी झाले, तर प्रभाग ०६ मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे सचिन लक्ष्मण खरात व शेख बदरुन्नीसा बेगम खुर्शीद अहमद यांनी बाजी मारली.
प्रभाग ०७ मधून काँग्रेसच्या नूरजहा मुश्ताक हाश्मी व भाजपचे फिरोज शेख अजीज, प्रभाग ०८ मधून केदार भवानीदास कुलकर्णी व पदमाबाई बाबुराव वराडे, प्रभाग ०९ मधून ललिता जितेंद्र बुर्ले व संदीप साहेबराव खरात, प्रभाग १० मधून भाजपच्या रंजना बाळूभाऊ खरात व राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे राम भिवराजी लांडे, तर प्रभाग ११ मधून भाजपच्या सावित्री सुरेश गुडे व विठ्ठलसिंग राजपूत यांनी विजय मिळवला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून ईव्हीएमद्वारे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी मनोज उकिरडे तसेच अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. देवयानी कुलकर्णी यांच्याकडून अंबड शहराच्या विकासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, लहान मुलांसाठी उद्याने व खेळणी उपलब्ध करणे, अंबड शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रस्ते, पथदिवे, स्वच्छता व अन्य मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी संकेत दिले असून अंबडला सुरक्षित, स्वच्छ व सुविधा-समृद्ध शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *