
महिनाभरापासून ग्रामसेवक गैरहजर असल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. जन्म-मृत्यू नोंद, विविध दाखले, करआकारणी, घरकुल, जलपुरवठा, शौचालय योजना आदी मूलभूत सेवा विस्कळीत
जावेद शहा : रायपूर (पिंपळगाव सराई) येथे मागील महिनाभरापासून ग्रामसेवक गैरहजर असल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. जन्म-मृत्यू नोंद, विविध दाखले, करआकारणी, घरकुल, जलपुरवठा, शौचालय योजना आदी मूलभूत सेवा विस्कळीत झाल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार आंदोलन केले.
प्रशासनाकडून तात्पुरता ग्रामसेवक पाठवण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी तो प्रत्यक्षात गावात उपस्थित नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आंदोलनादरम्यान विस्तार अधिकारी अरविंद टेकाळे व गवते यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून तातडीने उपाययोजना सुरू असून बीडीओ कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती दिली.तथापि, कायमस्वरूपी ग्रामसेवकाची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. रायपूर येथे नियमित ग्रामसेवकाची नियुक्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
