
अंबड सार्वत्रिक निवडणुका 2025 : मतदानानंतर स्ट्रॉंग रूमवर 24 तास कडक सुरक्षा – तहसील कार्यालयात लाईव्ह स्क्रीनद्वारे नागरिकांना थेट पाहणीची सुविधा अंबड
जावेद शहा प्रतिनिधी : –अंबड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 मध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच सीलबंद EVM मशिन स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत. मतदानानंतरच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पूर्ण पारदर्शकता आणि सुरक्षेचा उच्चांक राखण्यासाठी अंबड तहसील प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. स्ट्रॉंग रूमवर 24 तास नजर ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांचे थेट दृश्य आता तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या मोठ्या स्क्रीनवरून पाहता येणार आहे.ही सुविधा सर्वसामान्य नागरिक, उमेदवार तसेच त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मतदानानंतर EVM सुरक्षित आहेत का, स्ट्रॉंग रूम परिसरात कोणतीही हालचाल होत नाही ना, याचे थेट निरीक्षण कोणालाही करता येईल.प्रशासनाने सांगितले की, स्ट्रॉंग रूम असलेल्या संपूर्ण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त, प्रतिबंधित झोन तसेच सुरक्षा यंत्रणेचे 24×7 निरीक्षण सुरू आहे. CCTV कॅमेरे प्रत्येक कोनातून स्ट्रॉंग रूमच्या आतबाहेर सतत रेकॉर्डिंग करीत आहेत. याच रेकॉर्डिंगचे लाईव्ह शूट थेट स्क्रीनवर प्रसारित केले जात आहे.या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी आणि स्क्रीनच्या उद्घाटनावेळी तहसीलतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना ही सुविधा कशी वापरायची याबाबत मार्गदर्शन केले.अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले की,“मतदानानंतरच्या काळात EVM च्या सुरक्षेबाबत कोणतीही शंका किंवा गैरसमज निर्माण होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी शांतता आणि विश्वास राखून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सहकार्य करावे.”या उपक्रमामुळे अंबडमध्ये झालेली निवडणूक प्रक्रिया आणि सुरक्षित स्थळी ठेवलेल्या मतदान मशिन ( EVM ) अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित असल्याचे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
