
धोंडराई गावात वीजपुरवठा ठप्प; संतप्त ग्रामस्थांचे प्रशासनाला आंदोलनाचे अल्टिमेटम
सहसंपादक जावेद शहा : १२ डिसेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा; गेवराई–बीडमधील सर्व शासकीय कार्यालयात निवेदन*गेवराई प्रतिनिधी :गेवराई तालुक्यातील मौजे धोंडराई येथे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सतत खंडित होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ अक्षरशः त्रस्त झाले असून अखेर ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी प्रशासनाला धडक देत आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे. ९ डिसेंबर २०२५ रोजी गेवराईपासून ते बीडपर्यंतच्या सर्व संबंधित शासकीय कार्यालयांत ग्रामपंचायत व संबंधित ग्रामस्थांनी लेखी निवेदन देऊन आपल्या प्रखर नाराजीची नोंद केली.गावातील अनेक भागात वीजपुरवठा दीर्घकाळ बंद राहिल्याने शेती, घरगुती कामे, पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांचा अभ्यास, तसेच आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम झाल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक वेळा बिड व गेवराई येथील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप ग्रामपंचायतीने निवेदनात केला आहे.याबाबत आज देण्यात आलेली निवेदने पोलिस अधीक्षक कार्यालय बीड, पोलिस स्टेशन गेवराई, कार्यकारी अभियंता कार्यालय बीड, अधीक्षक अभियंता कार्यालय बीड, उपकार्यकारी अभियंता कार्यालय गेवराई, तसेच तहसीलदार कार्यालय गेवराई या ठिकाणी जमा करण्यात आली. प्रत्येक कार्यालयात ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत स्पष्ट केले की, आता समस्या सोडवली नाही तर आंदोलन टाळणे शक्य राहणार नाही.*निवेदनात धोंडराई ग्रामपंचायतीने प्रशासनाला दोन दिवसांची अंतिम मुदत दिली* असून, १० व ११ डिसेंबरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी धोंडराई–गेवराई मार्गावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. “गावातील वीजपुरवठा तातडीने पूर्ववत न झाल्यास कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही. लोकांच्या मूलभूत हक्कांकडे होत असलेले दुर्लक्ष सहन केले जाणार नाही,” असे ग्रामपंचायतीने निवेदनात स्पष्ट केले.वीज नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत, शेतीचे काम ठप्प, मोटारी बंद, विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे नुकसान, तर काही घरगुती उद्योगधंदे बंद पडण्याच्या स्थितीत आले आहेत. त्यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, हीच ग्रामस्थांची मागणी आहे.या गंभीर परिस्थितीवर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्वरित पावले उचलली जातात का याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. १२ डिसेंबर रोजी होणारे आंदोलन टाळण्यासाठी संबंधित वीज विभागाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट संकेत ग्रामस्थांनी दिले आहेत.
