
जालन्यात एक कोटींचा गांजा जप्त
सहसंपादक जावेद शहा
अंबड (जालना) – अंबड तालुक्यातील कोचलबाडी शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात केलेली गांजाची शेती अंबड पोलिस आणि एटीएस पथकाने संयुक्त कारवाईत उध्वस्त केली. गुरुवारी (दि. ४) रात्री छापा टाकून सुमारे चार क्विंटल, अंदाजे एक कोटी रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शेतात मोठ्या प्रमाणात उगवलेल्या गांजाची झाडे उपटून त्याचा पंचनाम्यानंतर नायनाट करण्यात आला. शेतजमिनीचा मालक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्याचा शोध सुरू आहे.एटीएसचे सहाय्यक निरीक्षक सचिन इंगोळे व उपविभागीय पोलिस अधिकारी भगवान नरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. छाप्यात अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस निरीक्षक संदीप चोदके, सहाय्यक निरीक्षक विनोद गाडे यांच्यासह पथक सहभागी झाले.पोलिसांनी या प्रकरणात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे
