रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

प्रतिनिधी प्रतिनिधी बुलढाणा, जावेद शहा

(दि. २२ सप्टेंबर, २०२५) : जिल्ह्यातील एक्सप्रमुख शाळांपैकी एक असलेल्या रायपूर येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या सहा जागा अनेक दिवसांपासून रिक्त असल्यामुळे ५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. या समस्येवर त्वरित लक्ष घालून शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे.या शाळेत सध्या ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून, शासनाच्या नियमांनुसार येथे १६ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ १० शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची भरती न झाल्यामुळे ही कमतरता अधिकच तीव्र झाली आहे. विशेषतः वर्ग सहावी आणि सातवीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १८६ असून, त्यांना शिकवण्यासाठी फक्त दोन शिक्षक उपलब्ध आहेत. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी विषय शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांनी सांगितले की, शिक्षण हक्क कायदा (RTE – Right To Education Act 2009) आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा त्याचा हक्क आहे. मात्र, शिक्षकांच्या कमतरतेमुळे या हक्काची पूर्तता होत नाहीये.याचसंदर्भात, नुकत्याच झालेल्या जिल्हा अंतर्गत ऑनलाइन बदली प्रक्रियेत भाषा विषय शिक्षक आसिफ खान अयुब खान यांची बदली मोताळा पंचायत समितीमध्ये झाली. त्यांच्या जागी सादिक शाह इब्राहिम शाह यांची रायपूर शाळेत बदली झाली, परंतु ते अद्यापही शाळेत हजर झालेले नाहीत. त्यामुळे एक पद अजूनही रिक्तच राहिले आहे.या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी, सरपंच, उपसरपंच आणि पालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दहा दिवसांच्या आत ही समस्या सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी विनंती केली आहे. जिल्हा परिषद अतिरिक्त शिक्षकांची सोय करू शकते किंवा तात्काळ पर्यायी व्यवस्था करू शकते, अशी आशा पालकांनी व्यक्त केली आहे. ही समस्या लवकरच सुटेल आणि मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा सर्वजण करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *