स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात २६ जुलै रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात २६ जुलै रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर: आपण सत्तेत असलो तरी शिवसैनिकाचा खरा गुणधर्म हा लढवय्या आहे, अर्थात आपणा सर्वांचा गुणधर्म हा लढायचा आहे, तो कुणीही सोडू नका.. असे आवाहन करीत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जा.. शेतकऱ्यांच्या न्यायास्तव आंदोलन उभारा… किंबहुना प्रत्येक सर्वसामान्यांना न्याय मिळेल या दृष्टीने लढा उभारत आपली संघटना मजबूत केली पाहिजे असे स्पष्ट मत शिवसेना जिल्हा संघटक प्रमुख आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात २६ जुलै रोजी शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, जिल्हा उपप्रमुख संतोष डिवरे, भोजराज पाटील, संदीप गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, शहर प्रमुख किशोर नवले, मंगलसिंह राजपूत आदी पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे मार्गदर्शन करतांना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, शिवसैनिकांचा गुणधर्म हा लढायचा आहे तो कोणीही विसरता कामा नये किंबहुना या गुणधर्माचा विसर पडू नये, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांनासाठी धावून जा, त्यांना मदतीचा हात द्या, न्याया करिता आंदोलन उभारा.. वेळ पडल्यास लढा उभारा, कारण या मदतीच्या हातातूनच आपली संघटना मजबूत होणार आहे. लोकांची कामे करा ते तुम्हाला साथ देतील. समाज हिताच्या कार्यात सक्रिय राहून शिवसेनेची मजबूत बांधणी करा,शिवसेना सदस्य नोंदणी करून, गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक असला पाहिजे. या मजबुतीतून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत, नुसत्या लढवायच्याच नाही तर प्रत्येक ठिकाणी आपला शिवसैनिक निवडून येत सदस्य झाला पाहिजे. त्या दृष्टीने आता प्रत्येकाने जोमाने कामाला लागा असे स्फूरणदायी, प्रेरणादायी मत व्यक्त करीत शिवसैनिकांमध्ये नवचेतना निर्माण केली. प्रास्ताविकातून शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी बैठकी संदर्भातील माहिती विशद केली. दरम्यान आमदार संजय गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. कार्यरत पदे किती व रिक्त पदे किती यासंदर्भात तालुका प्रमुख विजय साठे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेत रिक्त पदे तात्काळ भरण्यावर भर दिला. संचालन व आभार प्रदर्शन विजय साठे यांनी केले. यावेळी कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे, उपतालुका प्रमुख ओंकारसिंग डाबेराव, उमेश राऊत, ज्ञानेश्वर इंगळे, उपशहर प्रमुख उमेश हिरूळकर, राजू फुलोलकर, मुकेश ललवानी, गजानन धाडे, विभाग प्रमुख सुरेश अहीर, विनायक बोरसे, राजू चांभारे, जितेंद्र पाटील,संभाजी सहावे,विजय काळे यासह मलकापूर तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. चौकट : कोणतेही पद हे शोभेची वस्तू नसते, प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला कसा न्याय मिळेल या दृष्टीनेच वाटचाल ठेवली पाहिजे, नुसते पद घेऊन चालणार नाही, तर त्या पदाला न्याय सुद्धा देता आला पाहिजे असे परखड मत व्यक्त करतानांच आपल्या संघटनेचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे संघटना वाढीवर कसा भर देत आहेत याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधत त्या दृष्टीने प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी संघटना मजबुतीकडे जातीने लक्ष देत आपले नेते एकनाथराव शिंदे यांचे हात मजबूत केले पाहिजे असे आवाहन सुद्धा आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *