
चौदा हजारांची लाच घेताना ‘एलसीबी’चा कर्मचारी जाळ्यात अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरंगे
रेतीची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच घेताना बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबीचा) एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात पकडण्यात आले. अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मलकापूर येथे ही कारवाई केली.गजानन देवचंद माळी (वय ५६) असे जाळ्यात अडकलेल्या लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी रेतीची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परधारकाने या संदर्भात तक्रार दिली होती.तक्रारदार टिप्परधारकाला एप्रिल आणि मे महिन्यात रेतीची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी गजानन माळी याने प्रत्येकी ८ हजार अशा एकूण १६ हजार रुपयांचीमागणी केली होती. टिप्परधारकाने या संदर्भात अकोला येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणी कारवाईत माळी याने तडजोडीअंती १४ हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आज, २३ मे रोजी मलकापूर नांदुरा रोडवरील शिवनेरी ढाब्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. यावेळी माळी याला १४ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विविध कालमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलासह स्थानिक गुन्हे शाखेत खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याविरुद्ध लाचखोरी प्रकरणातील ही आजवरची पहिलीच कारवाई असल्याची माहिती आहे.
