
झाडेलगाव रोड वरील एका शेतातील घटना मटणाची भाजी सांडल्यावरून वाद मित्रांकडूनच मित्राला मारहाण
अमिन शेख सहसंम्पादक
शेगाव: येथील धानोकार नगर परिसरात दोन मित्रांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संतोष पुंडलिक बोळे वय ४० असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी गणेश तांबळे आणि लल्ला भाकरे या दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष बोळे आणि आरोपी गणेश तांबळे व लल्ला भाकरे हे मित्र आहेत. १२ मे २०२५ रोजी हे सर्वजण झाडेगाव रोडवरील एका शेतात पार्टी करण्यासाठी गेले होते. रात्री जेवण करत असताना मटणाची भाजी सांडल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले.
आरोपी गणेश आणि लल्ला यांनी संतोषला लाठीने डोक्यात आणि कपाळावर मारून गंभीर जखमी केले. तसेच, त्यांनी संतोषच्या पाठीवर आणि उजव्या पायाच्या गुडघ्यावरही मारहाण केली. इतकेच नव्हे, तर आरोपींनी संतोषला जीवे मारण्याची धमकी देखील दिली, असे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संतोषला त्याच्या भावाने तातडीने शेगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. संतोष बोळे यांच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी गणेश तांबळे आणि लल्ला भाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार पो. हे. कॉ. आघव पो. कॉ. नरेश तायडे करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मित्रांमध्ये झालेल्या या हाणामारीच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.
