
मलकापूरचे तहसीलदार तायडे राज्यमंत्री जाधवांच्या रडारवर शिवसेना तालुकाप्रमुखाची कार्यप्रणालीवर नाराजी; कार्यकर्त्यांनी मांडल्या तक्रारी
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
मलकापूर : केंद्रीय आयुष मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्याकडे शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे यांनी तहसीलदार राहुल तायडे यांच्या कार्यप्रणालीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर या नाराजीच्या सुराला शिवसेनेच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी समर्थ साथ दिल्याने तहसीलदार राहुल तायडे केंद्रीय आयुष मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या रडारवर आले आहेत.

९ एप्रिल रोजी नामदार प्रतापराव जाधव मलकापुरात आले असता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. दरम्यान विजय साठे यांनी मलकापूरचे तहसीलदार राहुल तायडे कशा पद्धतीने कामकाज करतात, सामान्य माणसाला कसा त्रास देतात, चिरीमिरी केल्याशिवाय कोणतेही काम करत नाही, कार्यालयीन वेळेस तहसील कार्यालय व तहसीलदारांच्या दालनात दलालांचा कसा गराडा असतो, अनेक प्रकरणे सुनावणी न घेता कसा एकतर्फी निर्णय घेतला जातो, महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे शेत रस्ते तातडीने मोकळे करा असे शासनाचे धोरण आहे परंतु तहसीलदार या धोरणाला बगल देत आहे, शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याचा विषय घेऊन शेतकरी बांधवांसह तहसीलदार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले परंतु त्या निवेदनावर सुद्धा कसलीच कार्यवाही करण्यात आली नाही, या बाबीचा पाठपुरावा केल्यानंतरही तहसीलदार शेत रस्त्या प्रकरणी गंभीर दिसून आले नाही अशा अनेक बाबींचा पाढा वाचत उपरोक्त आरोपांची चौकशी केल्यास निश्चितच सत्यता समोर येईल असे मत सुद्धा त्यांनी नामदार प्रतापराव जाधव यांच्याकडे ठासून व्यक्त केले. तहसीलदारांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढले जात असतांनाच तेथे उपस्थित असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत व उपजिल्हा प्रमुख संतोष डिवरे,भोजराज पाटील, नांदूर तालुका प्रमुख सुनील जुनारे,शहर प्रमुख किशोर नवले, उपशहर प्रमुख उमेश हिरूळकर यांनी सुद्धा तहसीलदारांबद्दल सामान्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे किंबहुना तहसीलदार मनमानी पणाने कारभार हाकत असल्याचेही त्यांनी नामदार प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिले. पदाधिकाऱ्यांचा तहसीलदारांवरील नाराजीचा सूर पाहता नामदार प्रतापराव जाधव यांनी तहसीलदार कोठे आहेत अशी विचारणा करताच उपस्थित असलेले नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले यांनी समोर येत गैरहजेरीचे कारण कथन केले. त्यावर तहसीलदार असे कसे वागतात असा प्रश्नही उपस्थित केला. यावेळी डेप्युटी कलेक्टर हे सुद्धा उपस्थित होते. सर्वसामान्यांमधून तहसीलदाराच्या कार्यप्रणाली बद्दल उमटलेला नाराजीचा सूर पाहता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नामदार जाधव यांच्याकडे तहसीलदारांची तक्रार करीत याप्रकरणी आपण जातीने लक्ष घालावे अशी विनंती सुद्धा केली. त्यामुळे गैरहजर असलेले तहसीलदार राहुल तायडे हे नामदार प्रतापराव जाधव यांच्या रडारवर आले आहेत. चौकट : प्रोटोकॉल नुसार मंत्री महोदयांच्या दौऱ्यादरम्यान अधिकारी वर्गाला हजर राहणे गरजेचे असते असे असतानांही उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे व तहसीलदार राहुल तायडे हे मात्र नामदार प्रतापराव जाधव यांच्या दौऱ्या दरम्यान हजर दिसून आले नाही अर्थात दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही तर ते का गैरहजर होते हा विषय सुद्धा संशोधनाचा ठरत असून ही बाब सुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नामदार प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली.
