
मित्रानेच केला मित्राचा घात..! रुमालाने नाक तोंड दाबून केली हत्या
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील मोकळ्या मैदानात बुधवारी, १५ जानेवारी रोजी रात्री उशिरा प्रविण अजाबराव संबारे (वय २७, रा. बेलाड, ता. मलकापूर) या युवकाची तोंड दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रविणचा भाऊ सचिन अजाबराव संबारे (वय ३२) याने पोलिसांत तक्रार दिली असून वैभव गोपाल सोनार (वय २१, रा. तरोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव खांदेश) या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिनच्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये आरोपी वैभवने त्याला फोन करून प्रविणला आपल्या बहीणीपासून दूर राहण्याच्या धमक्या दिल्या होत्या. या रागातून वैभवने प्रविणला दारु पाजून त्याची तोंड दाबून हत्या केल्याचे नमूद केले आहे. मलकापूर शहर पोलिसांनी १६ जानेवारी रोजी अप क्रमांक २०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे व उपनिरीक्षक सुरेश रोकडे तपास करत आहेत.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. आपल्या मित्राला दारू पाजून त्याचा घात केला. त्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तसेच अंत्यसंस्कार होईस्तोवर आरोपी वैभव याने साळसूदपणाचा आव आणला. जणूकाही या घटनेशी त्याचा काही एक संबंधच नाही, अशा आविर्भावात तो वावरला. मात्र, त्याचे पितळ उघडे पडले.
