
अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार चैनसुख संचेती उपजिल्हा रुग्णालय गाठले.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापुरः शेतात कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजूर महिलांना घराकडे घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने १३ महिला गंभीर जखमी झाल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान विवरा रस्त्यावर घडली. ही माहिती मिळताच प्रचार कार्यात व्यस्त असलेले भाजपा महायुतीचे उमेदवार चैनसुख संचेती यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत जखमींची आस्थेने विचारपूस करीत त्यांच्या पुढील उपचाराची व्यवस्था करून दिली. एकंदर धावपळीतही चैनसुख संचेती यांनी जखमींच्या वेदनांना प्राधान्य देत रुग्णसेवकाची भूमिका अदा केली.
ग्राम झोडगा येथील शेतमजूर महिला विवरा शिवारात वासुदेव किसन भोगे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. दिवसभर शेतात कापूस वेचून सायंकाळी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून घराकडे परतत असतांना विवरा रस्त्यावरील प्रल्हाद बोरले यांचे शेताजवळ ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलटी झाले. या अपघातात ट्रॅक्टर चालक प्रवीण वासुदेव भोगे सह ट्रॉली मधील शेतमजूर महिला जखमी झाल्या या जखमींना विवरा येथील ग्रामस्थांच्या मदतीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. या अपघातात संगीता गजानन मोरे वय ४०, प्रमिला शंकर वराडे वय ६०, उषा नारायण वेरूळकर वय ४०, राधाबाई पुंडलिक भारंबे वय ६५, सुनंदा माणिकराव चव्हाण वय ३०, बेबाबाई नामदेव आव्हाड वय ६५, प्रमिला लक्ष्मण सोळंके वय ३०, ताईबाई साहेबराव निकाळजे वय ३०, वंदना राजेंद्र खडसे वय ४०, सविता वैभव खडसे वय २२, सरला गणेश भोळे वय ३६, सुषमा शांताराम अहिरे वय ४०, उषा रमेश निकाळजे वय ३५ सर्व रा. झोडगा अशा एकूण १३ शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्या. या गंभीर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. स्वाती पाटील यांनी प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात केली अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार चैनसुख संचेती, शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे सह इतरांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले. दरम्यान चैनसुख संचेती यांनी गंभीर जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देत उर्वरित जखमींवर मलकापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करणे कामी मदत केली. उपजिल्हा रुग्णालयात एक्स-रे तंत्रज्ञ हजर नसल्याने जखमींची होणारी गैरसोय रुग्णालय अधिक्षक डॉ. राजेश उंबरकर यांना यांच्या निदर्शनास आणून देत या भोंगळ कारभाराबद्दल विचारला जाब विचारला. एकंदर निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असतानांही चैनसुख संचेती यांनी प्रचार कार्य थांबवित जखमींच्या मदतीला धावून गेले. प्रचारापेक्षा जखमींच्या वेदनांना प्राधान्य देत त्यांनी एका रुग्णसेविकाची भूमिका आजही पूर्वीसारखीच पार पाडली हे सुद्धा यावेळी प्रकर्षाने दिसून आले. या जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येऊन पुढील उपचारार्थ या जखमींना बुलढाणा रवाना करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
