
बैलापासून कृषीसंस्कृतीचे संवर्धन,प्राचार्य डॉ.सुनील पांडे
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
कास्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजीत ‘बैलपोळा’ भित्तीपत्रकाचे उद्घाटन ‘हरिबला महादेव’च्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पांडे होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.सुनील पांडे म्हणाले की, कृषी संस्कृतीत वाढत्या यांत्रिकीकरणाबीच्या हस्तक्षेपामुळे पारंपरिक कृषी संस्कृतीचा ऱ्हास होत आहे.कृषी संस्कृतीचे उज्ज्वल भविष्य टिकवायचे असेल तर शेतकरी वर्गाने बैलजोडीची जोपासना करणे आवश्यक आहे.शेतीसोबत जोडधंदा म्हणून गाई-म्हशींचे पालन करावे.तरुणांनी आधुनिक यंत्रसामग्रीसोबत पारंपरिक बैलजोडीचाही सकारात्मक दृष्टिकोनातून वापर करून शेतीकडे पाहावे असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ.अशोक इंगळे उपस्थित होते.ते बोलताना म्हणाले की, मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक,सांस्कृतिक आणि कृषिपरंपरांना उजाळा देणारी भित्तीपत्रके प्रकाशित केली जातात.बदलत्या काळात विद्यार्थ्यांच्या मनात कृषी संस्कृतीविषयीची आत्मीयता निर्माण व्हावी आणि आपल्या मातीत रुजलेल्या परंपरांचे महत्त्व त्यांना समजावे,या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.या भित्तीपत्रकामध्ये ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ,लोकनाथ यशवंत, सुखदेव ढाणके, विठ्ठल कुलट यांच्या कवितांसोबतच मराठी विभागातील प्रा.अनिल अंबलकार,डॉ.रणजीत गणोदे आणि डॉ.भूषण देशमुख यांच्या कवितांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भित्तीपत्रकातून बैल,शेतकरी आणि कृषी संस्कृतीशी असलेले भावबंध प्रभावीपणे व्यक्त झाले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिल अंबलकार यांनी केले.प्रास्ताविक डॉ.रणजीत गणोदे यांनी केले, तर आभार डॉ.भूषण देशमुख यांनी मानले.भित्तीपत्रकाचे लेखन व सजावट कु.राजनंदिनी डाबेराव हिने केली.या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ.संतोष कायंदे,डॉ.सचिन कोठेकर,डॉ.गजानन टवरे,डॉ.गजानन फेफरेतायडे,डॉ.संतोष वावगे,डॉ.मृणाल कडू यांच्यासह CHB प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारंपरिक कृषी संस्कृतीची जपणूक आणि बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
