
पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथे वनस्पतीशास्त्र, इतिहास आणि गृहअर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरणपूरक गणपती’ स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित विविध नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पकतेने वापर करून आकर्षक, कलात्मक आणि नाविन्यपूर्ण गणेशमूर्ती साकारल्या. विद्यार्थ्यांनी माती, कागद, नैसर्गिक घटक तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करून आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडविले.पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या माध्यमातून ‘पर्यावरण वाचवा, निसर्ग जपा’ हा संदेश देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.स्पर्धेत कु. स्वाती ठाकरे यांनी प्रथम क्रमांक, विकास पुंडकरे यांनी द्वितीय क्रमांक, तर साहिल काळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पांडे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. अशोक इंगळे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. संतोष पाटोळे, कला शाखा प्रमुख डॉ. संतोष कायंदे तसेच इतिहास विभाग प्रमुख डॉ. सचिन कोठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. सुनिल पांडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करणे ही काळाची गरज असून गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक व सांस्कृतिक उत्सवांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधींच्या शोधात न राहता आपल्या कौशल्यांचा विकास करून स्वयंरोजगार व रोजगारनिर्मितीकडेही वळावे, असे आवाहन त्यांनी केले.पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासारख्या उपक्रमातून कला, कौशल्य, कल्पकता आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत, मित्रपरिवारापर्यंत आणि समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा आदर्श निर्माण करावा, असेही प्राचार्यांनी नमूद केले.स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. अश्विनी फोकमारे यांच्यासह डॉ. नूतनवर्षा देशमुख, डॉ. भरत नागरे, डॉ. प्रिया अंदूरकर, डॉ. दिपाली भटकर आणि प्रा. धर्मा गावंडे यांनी विशेष सहकार्य केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला..
