माहिती अधिकार दिनानिमित्त अमरावती विभागातील भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे आदेश

माहिती अधिकार दिनानिमित्त अमरावती विभागातील भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे आदेश

नांदुरा तालुका प्रतिनिधी : (संदेश पहुरकर)

अमरावती : माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सुशासन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी अमरावती प्रशासकीय विभागातील भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये माहिती अधिकार दिनानिमित्त जनजागृती, व्याख्याने, मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.माहिती अधिकार संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्यचे जिल्हाध्यक्ष (बुलढाणा) तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय प्रकाश करांगळे, रा. नांदुरा, जि. बुलढाणा यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी उपसंचालक, भूमी अभिलेख, अमरावती प्रदेश, अमरावती यांच्याकडे दिनांक २८ सप्टेंबर २०२६ रोजी माहिती अधिकार दिन संबंधित कार्यालयांमध्ये साजरा करून जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत, अशी मागणी करणारी तक्रार सादर केली होती.या तक्रारीची दखल घेत उपसंचालक, भूमी अभिलेख, अमरावती प्रदेश, अमरावती कार्यालयाकडून ९ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.या आदेशानुसार अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या अमरावती प्रशासकीय विभागातील संबंधित भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये माहिती अधिकार अधिनियमाबाबत जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने, मार्गदर्शनपर कार्यक्रम व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच जनमाहिती अधिकारी (PIO) व प्रथम अपीलीय अधिकारी (FAA) यांना माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज हाताळणी, त्यांच्या वैधानिक जबाबदाऱ्या, अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया आणि प्रथम अपील याबाबत विशेष मार्गदर्शन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.कार्यालयांच्या दर्शनी भागात माहिती अधिकारासंदर्भातील आवश्यक माहिती, अर्ज करण्याची पद्धत, संबंधित अधिकाऱ्यांची माहिती, अर्ज शुल्क, अपील प्रक्रिया व संपर्क तपशील स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. प्राप्त माहिती अधिकार अर्जांवर कायद्यातील निर्धारित कालमर्यादेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार अर्ज तसेच प्रथम अपिलांची नियमित तपासणी व प्रशासकीय निरीक्षण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आदेशातून देण्यात आल्या आहेत.माहिती अधिकार संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय प्रकाश करांगळे यांच्या मागणीची दखल घेऊन अवघ्या काही दिवसांत विभागीय स्तरावर आदेश निर्गमित झाल्याने, माहिती अधिकाराबाबत जनजागृती आणि प्रशिक्षणाला संस्थात्मक स्वरूप मिळण्यास मदत होणार आहे. विभागाने दिलेले हे निर्देश पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहेत दत्तात्रय प्रकाश करांगळे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य, बुलढाणा सामाजिक कार्यकर्ता, रा. नांदुरा, जि. बुलढाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *